पुणे : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या २०२४-२५ चा गळीत हंगाम (दि.१५) नोव्हेंबरपासून सुरु होऊन ३१ दिवसांमध्ये जवळपास २ लाख ६५ हजार टन गाळप पूर्ण करून सरासरी १०.४० रिकव्हरी प्रमाणे २ लाख ७२ हजार साखर पोत्यांचे उत्पादन झालेले आहे. कारखान्याची आजची रिकव्हरी ११.६६ एवढी आहे. तरी देखील सोमेश्वरने पहिली उचल अद्यापपर्यंत जाहीर केलेली नाही. कारखान्याने पहिली उचल ३३०० रुपये जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे यानी केली
काकडे म्हणाले की, कारखान्याचे चेअरमन, संचालक मंडळ व कार्यकारी संचालक हे सभासदांना जाणीवपूर्वक वेठीस धरून कारखाना सभासदांच्या उसाचे बिनव्याजी कोट्यावधी रूपये सालाबाद प्रमाणे वापरत आहे. परंतु दुसऱ्या बाजुला मात्र सभासदांच्या सोसायटीचे व्याज चालू आहे. सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन मागील काही वर्षापासून पहिली उचल व अंतिम भाव जाहिर करून त्याचे श्रेय स्वतः घेत आलेले आहेत. मग आत्ता यावर्षी ते का गप्प आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश सर्व साखर कारखान्यांनी पहिली उचल ३२०० रुपये प्रती टन जाहिर करून काही कारखान्यांनी उस बिले देण्यासही सुरूवात केली आहे.
ते म्हणाले, ‘सोमेश्वर’चे उच्चांकी गाळप, चांगला साखर उतारा, उच्चांकी साखरपोती, जादाचे उपपदार्थ उत्पादन व वीज निर्मितीमध्ये अग्रेसर असल्याने कारखान्याने मागील काही वर्षापासून उच्चांकी अंतिम दर दिला आहे. मग कारखान्याची आर्थिक परिस्थिती चांगली असतानाही चेअरमन २०२४- २५ ची पहिली उचल जाहिर न करता मूग गिळून गप्प का आहेत, असा सवाल काकडे यांनी यावेळी केला. यंदा गळीत हंगामाची पहिली उचल एकरकमी ३३०० प्रति टन तात्काळ जाहिर करून सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग करावी. कारखान्यामध्ये गाळपास येणारा गेटकेन ऊस तात्काळ १०० टक्के बंद करावा. चेअरमन, संचालक मंडळ व कार्यकारी संचालक यांनी एक आठवड्यामध्ये गेटकेन उसाचे गाळप बंद न केल्यास शेतकरी कृती समितीस मोर्चा काढून काटा बंद आंदोलन करावे लागेल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
गेटकेन ऊस थांबवा, कार्यक्षेत्रातील ऊस तोडणी करा
काकडे म्हणाले की, सोमेश्वर कारखान्याच्या चेअरमन यांनी सभासदांच्या ऊसतोडी २१ ते २२ महिने लांबवून सभासदांचे आर्थिक नुकसान करून गेटकेन उस मोठ्या प्रमाणात गाळप करून गाळपाचा उच्चांक निर्माण केला होता. यावर्षीही ऊस तोडीचे नियोजन करून दिवसाला १५०० ते १८०० टन उस गाळपास आणून आत्तापर्यंत ४० हजार टन गेटकेन उस गाळपास आणला आहे. सभासदांच्या ऊस तोडी लांबत असून वजन घटत आहे. दुबार पिकही बुडत आहे. चेअरमन यांनी तात्काळ १०० टक्के गेटकेन उसाचे गाळप बंद करावे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील मोठ्या प्रमाणात ऊस बाहेरील कारखान्यांकडे गाळपास जात आहे. सभासदांच्या ऊस गाळपास प्रथम प्राधान्य द्यावे.