सोमेश्वर साखर कारखान्याचा १०० रुपयांचा दुसरा हप्ता जमा : अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप

पुणे : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने १७६ दिवसांमध्ये उसाचे एकूण १५ लाख २३ हजार ८७६ टन सर्वोच्च गाळप करून बी हेवीसह १२.२१ टक्के सरासरी साखर उतारा राखून १८ लाख २६ हजार ५०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. कारखान्याच्या गळीत हंगाम २०२३-२०२४ ची नुकतीच सांगता झाली आहे. कारखान्याच्यावतीने प्रती टन १०० रुपयांचा दुसरा हप्ता आज, दि. ६ मे २०२४ रोजी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.

राज्यातील ७,५०० टन प्रतीदिनी गाळप क्षमता असणाऱ्या कारखान्यांमध्ये ‘सोमेश्वर’ने सर्वोच्च गाळप व साखर उत्पादन केले आहे. हंगामात रोज सरासरी ८,६५८ टन गाळप करून ११५ टक्के कार्यक्षमतेने २,०३,८७६ टन उसाचे जादाचे गाळप केले आहे. ऊस बिलापोटी ३,००० रुपयांचा पहिला हप्ता अदा केला आहे. अध्यक्ष जगताप म्हणाले की, अंतिम पंधरवड्याचे बिल ३,००० अधिक २०० रुपयांप्रमाणे अनुदान शनिवारी बँक खात्यात जमा केले. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च व एप्रिलसाठी अनुक्रमे ७५, १००, १५० व २०० रुपये असे अनुदानही यापूर्वीच आदा केले आहे. कारखान्याच्या डिस्टीलरीमधून ८४,३१,४३८ लिटर अल्कोहोल, ३१,८२,५५४ लिटर इथेनॉलचे उत्पादन व को-जनरेशन प्रकल्पातून ९,६५,१५,३४५ युनिट्स विजेची निर्मिती होऊन ५,१४,४४,८३१ युनिटची विक्री झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here