पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने डिस्टिलरी विस्तार,वाढवण्यासाठी घेतलेल्या परतीच्या ठेवींचे नूतनीकरण करू नये, अशी मागणी भाजपने सोमेश्वर कारखान्याकडे करण्यात आली आहे. भाजपचे तालुका अध्यक्ष प्रकाश जगताप, पदाधिकारी शंकरराव दडस, बाळासाहेब भोसले, बाबूराव गडदरे, खलील काझी आणि संपतराव भोसले यांनी कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांच्याकडे निवेदन दिले.
कारखान्याने सन २०१८-१९ या हंगामातील कपात केलेल्या या ठेवी आहेत.सोमेश्वर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा गरुवारी (दि २६) होत आहे. या सभेच्या विषय क्र. ७ मध्ये सभासदांची ठेव नूतनीकरण करण्याबाबतचा विषय आहे. मात्र, परतीच्या ठेवीचे नूतनीकरण न करता त्या सभासदांच्या खात्यावर दीपावलीसाठी वर्ग करण्यात यावी, अशी मागणी जगताप यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी केली. कारखान्याची आर्थिक स्थिती चांगली आहे. वार्षिक सभेपूर्वी कारखान्याने वाढीव डिस्टिलरीच्या डीपीआरची प्रत द्यावी, अशी मागणी जगताप यांनी केली आहे.