पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाची शुक्रवारी (दि. २६) सांगता झाली. त्यानंतर ऊसतोड कामगारांची घरी जाण्यासाठी लगबग सुरू असल्याचे कारखाना कार्यस्थळावर दिसून येत आहे. कारखान्याच्या वतीने बैलगाड्या जमा करण्याचे काम सुरू आहे. हंगामात बीड, धाराशिव, लातूर, जालना, पाटोदा, यवतमाळ, अहमदनगर आदी भागातील सुमारे नऊ हजार कामगार सोमेश्वर परिसरात दाखल होत असतात. ते आता आपले संसारोपयोगी साहित्य, कपडे, धान्य, जनावरे आदी साहित्य वाहनांत भरून गावी जाण्याची तयारी करत आहेत.
हंगाम बंद झाल्याने येत्या दोन दिवसांत परिसर ओस पडणार आहे. त्यामुळे येथील बाजारपेठेवर काहिसा परिणाम जाणवणार आहे. मात्र, हंगाम सुरळीत पार पडल्याचे समाधान या कामगारांच्या चेहऱ्यावर दिसत होते. यंदा सोमेश्वर कारखान्याचा हंगाम उशिरापर्यंत चालला. सहा महिन्यांत दीड, दोन लाख रुपयांची उचल फेडली. धंदा चांगला झाला. आता गावाकडे जात आहोत. गावी पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण आहे. पाऊस होताच गावाकडे शेतातील कामे करणार असल्याची प्रतिक्रिया ऊसतोड कामगार आप्पा फाळके, संदीप काशीद, सतीश गांजले यांनी दिली.