पुणे: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने येणाऱ्या हंगामात १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. हंगामासाठी ऊसतोडणी कामगारांचे करार पूर्ण झाले असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली. सोमेश्वरकडे सभासदांचा साडेअकरा लाख मेट्रिक टन ऊस गाळपास आहे, तसेच गेटकेनधारकांचा दीड लाख मेट्रिक टन ऊस आणून कारखान्याचे १३ लाख गाळपाचे नियोजन असल्याचे जगताप यांनी सांगितले. सोमेश्वर कारखान्याच्या ६३ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ दसऱ्याच्या मुहूर्तावर अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप त्यांच्या पत्नी रोहिणी यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
सोमेश्वर कारखाना गाळप हंगामात सुरुवातीच्या ७० ते ७५ दिवसांत सभासदांच्या आडसाली उसाच्या गाळपास प्राधान्य देणार आहे. हे गाळप झाल्यानंतर टप्प्या-टप्प्याने गेटकेन उसाचे गाळप केले जाईल, अशी ग्वाही पुरुषोत्तम जगताप यांनी यावेळी दिली. जगताप म्हणाले, आगामी गाळप हंगामासाठी सोमेश्वरकडे ११५० बैलगाडी, ३८० ट्रक ट्रॅक्टर, २६० डंपिंग तसेच २० हार्वेस्टर या यंत्रणाचे करार पूर्ण झाले आहेत. तोडणी व वाहतूकदार यंत्रणेला अॅडव्हान्स पोटी कारखान्याकडून ४८ कोटी रुपये दिले आहेत. सभासद, कामगार, ऊसतोड कामगार व अधिकारी यांच्या सहकाऱ्याने गाळप हंगाम यशस्वी पार पाडू, असा विश्वास जगताप यांनी या वेळी व्यक्त केला.
सोमेश्वर कारखाना १६७ कोटी रुपये खर्चुन ९० हजार लिटर प्रतिदिन क्षमतेची डिस्टलरी उभारणार आहे. याचाही फायदा सभासदांना दरात होणार आहे. ३ हजार ४०० रुपये एफआरपी देण्यासाठी ४ हजार रुपये एमएसपी देण्याची गरज पुरुषोत्तम जगताप यांनी यावेळी व्यक्त केली. ‘सोमेश्वर’चे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे, राजवर्धन शिंदे, उपाध्यक्ष बाळासाहेब कामथे, संचालक संग्राम सोरटे, अभिजीत काकडे, ऋषिकेश गायकवाड, प्रणिता खोमणे, कमल पवार, विक्रम भोसले, कारखान्याचे अन्य संचालक कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, शेतकी अधिकारी बापूराव गायकवाड, विराज निंबाळकर यांच्यासह सभासद अधिकारी उपस्थित होते. आभार उपाध्यक्ष बाळासाहेब कामथे यांनी मानले.