सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या राम सातपुते यांचा विजय झाला आहे. त्यांनी राष्ट्रवादीच्या उत्तम जानकर यांचा सहा हजार मतांनी पराभव केला आहे. मोहिते-पाटील गटाचे वर्चस्व असलेल्या माळशिरस मधून ऐनवेळी उत्तम जानकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे भाजपाने सर्वसामान्य राम सातपुते यांना उमेदवारी दिली होती. मतदारांनी राम सातपुते यांना विजयी करत भाजपाच्या निर्णयाला एकप्रकारे पाठिंबा दिला.
राम सातपुते हे मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय समजले जाते. त्यांनी भाजपाच्या युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्षपदही सांभाळले आहे. राम सातपुते मुळात सर्वसामान्य कुटुंबातील असल्यामुळे जनतेशी त्यांचा चांगला संपर्क आहे. राम यांचे आई-वडिल ऊसतोडी करत होते. भाजपानेही एका उसतोड कामगाराच्या मुलाला आमदारकीचे तिकीट देऊन सध्याच्या राजकीय घराणेशाहीला फाटा दिला. जनतेनेही या निर्णयाला मतपेटीतून कौल दिल्याचे दिसतेय.
राम सातपुते यांची घरची परिस्थिती बेताची होती. माळशिरस तालुक्यातील भांबुर्डीची कायम दुष्काळी गावात राम सातपुते यांचे लहानपण गेले. वडील विठ्ठल सातपुते यांनी ऊस तोडणीचे कष्टप्रद काम करुन मुलांना शिक्षण दिले. शंकर सहकारी साखर कारखान्याकडे विठ्ठल सातपुते हे १९९० ते १९९५ पर्यंत ऊस तोडणीचे काम करत होते. माध्यमिक शिक्षण खेड्यामध्ये घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी राम सातपुते यांनी पुणे गाठले. त्यावेळीच त्यांचा विद्यार्थी संघटनेशी संपर्क आला.तेथूनच त्यांनी विद्यार्थी संघटनेच्या चळवळीला सुरुवात केली. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील काम पाहून राम सातपुते यांना भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपद देण्यात आले.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.