सोनीपत : सोनीपत सहकारी साखर कारखान्याला गेल्या २० वर्षानंतर साखरेचा उतारा १० टक्क्यांवर नोंदला गेला आहे. यावर्षी साखर कारखान्याचा नफा २० कोटी रुपयांपेक्षा जादा झाला आहे. जिल्ह्यातील १८५ गावांतील ५०० पेक्षा अधिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. अनुपमा मलिक यांना त्याचे श्रेय देत एका कार्यक्रमात त्यांचा सन्मान केला. गेल्या अनेक वर्षांपासून सोनीपत सहकारी साखर कारखाना गळीत हंगामात विविध कारणांमुळे योग्य पद्धतीने कामकाज करू शकत नव्हता. कधी कधी जुनी मशीनरी खराब झाल्यामुळे तर कधी इतर कारणांनी गाळपात अडथळे येत होते. यंदा मात्र, पूर्ण हंगाम चांगला गेला.
दैनिक ट्रिब्यूनमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, एमडी डॉ. अनुपमा मलिक यांनी सांगितले की, गेल्या गळीत हंगामादरम्यान, २ लाख ७६ हजार ७० पोती साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा ३०.७५ लाख क्विंटल ऊस गाळप करुन ३ लाख ८ हजार ६०० पोती साखर उत्पादित झाली आहेत. कारखान्याला जादा साखर उत्पादनामुळे ११.७० कोटी रुपयांचा फायदा मिळाला आहे. याशिवाय गेल्या हंगामातील मोलॅसीस विक्रीतून २.२० कोटी रुपयांचा नफा मिळाला. यंदाच्या हंगामात करारांच्या आधारावर गेल्या वर्षी लागलेल्या ४७४ कामगारांच्या तुलनेत यंदा ३७३ कामगारांमध्ये काम केल्याने वेतनात अनेक कोटींची बचत झाली. एक महिना आधी गाळप हंगाम पूर्ण करून व्यवस्थापनावरील खर्चात ६८ लाखांची बचत करण्यात आली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी ललित सिवाच यांच्या उपस्थितीत एमडी मलिक यांचा सत्कार केला.