नवी दिल्ली : भारताने निर्धारीत वेळेआधी, पाच महिन्यांपूर्वी १० टक्के इथेनॉल मिश्रीत पेट्रोल पुरवठ्याचे उद्दिष्ट गाठले आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तेल निर्यातीवरील अवलंबीत्व कमी करण्यासाठी २०२५-२६ पर्यंत मिश्रण दुप्पट करण्याचे उद्दीष्ट आहे असे ते म्हणाले.
दरम्यान, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सोमवारी सांगितले की, एप्रिल २०२३ पूर्वी देशातील निवडक पेट्रोल पंपांवर २० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल उपलब्ध होऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर २०२२ च्या अंतिम मुदतीपूर्वी, सुमारे ५ महिने आधी पेट्रोलमध्ये इथेनॉलचे १० टक्के मिश्रण साध्य केल्याची घोषणा केल्यानंतर मंत्री पुरी यांनी याबाबतची पुढील भूमिका मांडली. आम्ही निश्चित केलेल्या उद्दीष्टाच्या पाच-सहा महिने आधी इथेनॉलचे १० टक्के मिश्रण केले आहे असे पुरी म्हणाले.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स आणि वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडियाच्यावतीने आयोजित ‘लीडर इन क्लायमेट चेंज मॅनेजमेंट’ (एलसीसीएम) कार्यक्रमात बोलताना मंत्री पुरी म्हणाले की, १० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दीष्ट आधीच साध्य झाले आहे आणि आता आम्ही २० टक्के इथेनॉल मिश्रण करणार आहोत. २०२५ पर्यंत मिश्रणाचे लक्ष्य गाठण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ई २० पेट्रोल १ एप्रिल २०२३ रोजी किंवा त्यापूर्वी उपलब्ध होईल, असा दावा त्यांनी केला.