ढाका : बांगलादेशमध्ये पंतप्रधानांच्या सूचनेनुसार अधिकारी स्थानिक उत्पादन वाढवण्याचा आणि आयात कमी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे बांगलादेशातील साखर उद्योग लवकरच पुनरुज्जीवन होईल, असे उद्योग मंत्रालयाच्या सचिव झाकिया सुल्ताना यांनी सांगितले.
टीबीएस न्यूजवर प्रकाशित वृत्तानुसार, उद्योग सचिवांनी झेनैदह येथील मोबारकजंग साखर कारखाना तसेच दर्शना, चुआडंगा येथील केअर्यू अँड कंपनी लिमिटेडला भेट दिल्यानंतर ही टिप्पणी केली. सुल्ताना यांनी सांगितले की, जादा उत्पादन देणाऱ्या उसाच्या जातींचा आम्ही शोध घेत आहोत. उत्पादकांनाही तांत्रिक सहाय्य केले जात आहे. शेतकऱ्यांना पिक घेण्यासाठी प्रोत्साहन म्हणून आम्ही उसाच्या किमती वाढवल्या आहेत. इतर मदत करण्याची हमी त्यांना दिली आहे.
यावेळी बांगलादेश शुगर अँड फूड इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन (बीएसएफआयसी) चे अध्यक्ष मोहम्मद आरिफूर रहमान अपू, ब्रिटिश अमेरिकन टोबॅको (बीएटी) बांगलादेशचे अध्यक्ष गोलाम मोईनुद्दीन, साखर कारखान्याचे अधिकारी आणि स्थानिक ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.ब्रिटिश अमेरिकन टोबॅको बांगलादेशच्यावतीने देशात दर्जेदार ऊस उत्पादनास पाठिंबा आणि प्रोत्साहन देण्यासाठी एकत्र काम केले जात आहे, असे सुल्ताना यांनी सांगितले. आम्ही या उद्योगाला पुढे नेण्यासाठी विविध पावले उचलली आहेत, असे उद्योग सचिवांनी सांगितले.