केपटाउन : देशात गेल्या वर्षी कोरोना महामारीमुळे साखर उद्योगाला कठीण आर्थिक स्थितीतून जावे लागले. साखर विक्री पूर्णपणे थांबली होती. मात्र, आता साखर विक्रीत १५ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे उद्योगाला मोठा दिलासा मिळाला आहे, असे व्यापार, उद्योग मंत्री अब्राहीम पटेल यांनी सांगितले. शेतकरी, कारखानदार, विक्रेते, उत्पादक आणि ट्रेड युनीयनसोबतच्या बैठकीत ते बोलत होते.
साखर उद्योगाच्या विकासासाठी एका मास्टर प्लॅनच्या स्वाक्षरीनंतर पुढील धोरण ठरविण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. किरकोळ आणि औद्योगिक क्षेत्राकडून साखर खरेदीत वाढ दिसून आली आहे. यात शीतपेय निर्मात्यांचाही समावेश असल्याचे सांगण्यात आले. मंत्री पटेल म्हणाले, साखर उद्योगाने आपली स्पर्धात्मक सुधारणा करत, छोट्या शेतकऱ्यांना संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. नव्या बाजारपेठेत निर्यातीची क्षमता वाढविण्याची गरज आहे. कामगारांसोबतच्या भागीदारीला अधिक मजबूत केले पाहिजे.
ते म्हणाले, कोका कोला ब्रेवरेजिससोबत नुकत्याच झालेल्या करारानुसार दक्षिण आफ्रिकेतील छोट्या शेतकऱ्यांकडून अधिकाधीक साखर खरेदी केली जाणार आहे. साखर उद्योगाला अधिक मजबूत बनविण्यासाठी काय करता येते हे दर्शविण्यासाठी हे उदाहरण पुरेसे आहे, असे पटेल म्हणाले.