नवी दिल्ली : केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने 28 जुलै 2023 पर्यंतच्या देशातील खरीप पेरणीची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यात देशात खरीप पिकांच्या पेरणीने 830 लाख हेक्टर क्षेत्र ओलांडल्याचे सांगण्यात आले आहे. ऊस आणि भात पिकाखालील क्षेत्रात वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. भात पेरणीमध्ये गेल्या वर्षीच्या 233.25 लाख हेक्टरच्या तुलनेत 4.33 लाख हेक्टरने वाढ होऊन ते 237.58 लाख हेक्टर इतके झाले आहे.
देशातील खरीप हंगामाच्या एकूण क्षेत्रापैकी ७६ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत १.३४ लाख हेक्टर कमी पेरण्या झाल्या आहेत. देशात खरीप हंगामाचे एकूण क्षेत्र १०९१.७३ लाख हेक्टर असून, त्यापैकी 830.31 लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. तृणधान्ये, भरड तृणधान्ये आणि तेलबियांची भात पेरणी गेल्या वर्षीपेक्षा जास्त झाली आहे, तर कडधान्य पिके खूपच मागे पडली आहेत.त्याचे क्षेत्र गतवर्षीच्या तुलनेत 12.32 लाख हेक्टरने कमी आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा उसाची लागवड जास्त झाली आहे. यंदा ५६ लाख हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे, तर गेल्यावर्षी २८ जुलैपर्यंत केवळ ५३.३४ लाख हेक्टरवर उसाची लागवड झाली होती. यंदा उसाच्या क्षेत्रात २.६६ लाख हेक्टरने वाढ झाली आहे.