उत्तर प्रदेशातील विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल करताना भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सांगितले की, समाजवादी पक्ष (सपा) आणि बहुजन समाजादी पार्टी (बसपा) या दोघांनी मिळून उत्तर प्रदेशातील २९ साख कारखाने बंद पाडले. दोन्ही पक्षांनी ११ साखर कारखाने कवडीमोलाच्या दरात विकले. तर भाजप सरकारने अनेक नवे साखर कारखाने सुरू केले असे नड्डा म्हणाले.
कुशीनगरमध्ये एका जाहीर सभेत बोलताना भाजप अध्यक्ष म्हणाले, सपा आणि बसपाने यूपीतील २९ साखर कारखाने बंद पाडले. आणि ११ साखर कारखाने अतिशय कमी किमतीला विकले. योगी सरकारने मात्र, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १.४१ लाख कोटी रुपयांची ऊस बिले दिली आहेत. यासोबतच अखिलेश सरकारच्या कार्यकाळातील ११ हजार कोटी रुपयांची थकबाकीही शेतकऱ्यांना मिळवून दिली आहे. भाजप सरकारने हे काम केले आहे. भाजप सरकारने उत्तर प्रदेशात अनेक नवे साखर कारखाने सुरू केले आहेत, असे नड्डा यांनी सांगितले.