नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची (एमपीसी) गुरुवारी खास बैठक होणार आहे. या बैठकीत रेपो रेटमध्ये चार वेळा वाढ केल्यानंतरही महागाई नियंत्रणात येत नसल्याच्या कारणांची चर्चा केली जाईल. यासोबत बैठकीनंतर पतधोरण समिती सरकारला एक पत्र लिहून महागाई नियंत्रणात येत नसल्याबाबत कारणमीमांसा करेल. महागाईचा दर २ ते ६ टक्क्यांदरम्यान ठेवण्याचे केंद्रीय बँकेचे उद्दिष्ट आहे. मध्यम कालावधीच्या सामान्य उद्दिष्टाचा विचार केला तर आरबीआयचे स्टँडर्ड टार्गेट ४ टक्के आहे. यामध्ये २ टक्क्यांची वाढ अथवा घट अपेक्षित असते.
जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, आरबीआयच्या नियमानुसार, जर महागाईचे उद्दीष्ट सलग तीन तिमाहींमध्ये नियंत्रणात येत नसेल तर केंद्रीय बँक सरकारला एक रिपोर्ट सादर करेल. यामध्ये महागाई नियंत्रणात आणण्यात येणाऱ्या अपयशाच्या कारणांचा आढावा घेतला जाईल. यासाठी काय उपाययोजना केली गेली आणि त्याचा कितपत परिणाम झाला याचा आढावा घेतला जाईल. महागाई कधी नियंत्रणात येवू शकते याचा कालावधीही आरबीआयला सांगावा लागेल. २०१६ नंतर पहिल्यांदाच एमपीसीची खास बैठक होत आहे. घाऊक महागाईचा दर जानेवारी महिन्यापासून ६ टक्क्यांच्या वर आहे. आणि सप्टेंबर महिन्यात अन्नधान्याच्या किमती वाढल्याने या महिन्यात हा दर, पाच महिन्यांच्या उच्च स्तरावर ७.४१ टक्क्यांवर पोहोचला आहे. या बैठकीत रेपो रेटमध्ये वाढ होण्याची अपेक्षा नाही. मात्र, दरवाढ होणारच नाही असेही खात्रीपूर्वक सांगता येत नाही असे सूत्रांचे म्हणणे आहे.