सातारा : जिल्ह्यात १६ साखर कारखान्यांकडून जोमाने गाळप सुरू आहे. दैनंदिन ८४ हजार २०० मेट्रीक टन उसाचे गाळप होत आहे. १ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत साखर कारखान्यांनी २२ लाख २१ हजार २८३ टन उसाचे गाळप करून १८ लाख १५ हजार ३९५ क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. तर जिल्ह्याचा सरासरी उत्तारा हा ८.१७ टक्के पडला आहे. आतापर्यंत हंगामात सहकारी साखर कारखाने गाळप आणि उताऱ्यात आघाडीवर राहिले आहेत.
गतवर्षी याच कालावधीत साखर उतारा हा १० टक्क्यांच्या पुढे होता. मात्र, दुष्कळग्रस्त परिस्थितीमुळे उतारा घटल्याचे चित्र आहे. यंदा उताऱ्यात २ टक्क्यांची घट होऊन ८.१७ टक्क्यांवर आला आहे. साखरेच्या उत्पादनातही घट झाली आहे. तीन कारखान्यांची रिकव्हरी ही ६ च्या आत आहे.
काही कारखान्यांनी साखरेपेक्षा इथेनॉल उत्पादनावर अधिक भर दिला आहे. बहुतांश कारखान्यांचे गाळप हे १ ते दीड लाख टनांवर गेले आहे. मात्र, त्यातील निम्मा ऊस हा इथेनॉलकडे वळवला आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे इथेनॉलचे प्रकल्प आहेत, त्यांची रिकव्हरी जास्त घसरल्याचे चित्र आहे. सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकरी ऊस पीक वाळण्यापूर्वी कारखान्याला पाठविण्याच्या प्रयत्नात आहे. दुसरीकडे पूर्ण क्षमतेने गाळप होण्यासाठी कारखान्यांकडून जास्तीत जास्त ऊस आणण्याचे नियोजन केले जात आहे. आतापासूनच उसाची पळवापळवी सुरू झाली आहे.