कोल्हापूर : मागील हंगामात गाळप केलेल्या उसाचा दुसरा हप्ता प्रतिटन ४०० रूपये द्यावा, राज्यातील साखर कारखान्यांचे वजन काटे डिजीटल केल्याशिवाय यंदा गाळपास परवानगी देऊ नये, या दोन प्रमुख मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी दि. १७ ऑक्टोबर २०२३ पासून शिरोळ येथील दत्त साखर कारखान्यापासून आक्रोश पदयात्रेस सुरूवात केली. बुधवारी (१८ ऑक्टोबर) दुस-या दिवशी ही पदयात्रा रांगोळी गावात पोहचली. सकाळी ८ वाजता हेरवाड येथून दुस-या दिवशीच्या पदयात्रेस प्रारंभ झाला. त्यांतर यात्रा अब्दुललाट, शिरदवाड, रांगोळी, हुपरी जवाहर साखर कारखाना, यळगूड व कसबा सांगावकडे मार्गस्थ झाली.
सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी केवळ एफआरपी दिलेली आहे. साखरेचे बाजारभाव ३८०० रूपयांच्या घरात आहेत. पुणे जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी एफआरपीपेक्षा ४०० ते ५०० रूपये अधिक रक्कम दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांची रिकव्हरी पुणे जिल्ह्यापेक्षा जास्त असताना देखील दुसरा हप्ता देण्यास नकार देत आहेत. साखर कारखानदारांच्या आडमुठ्या धोरणामुळे चर्चा फिस्कटली. त्यामुळे राजू शेट्टींनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिलेला आहे. दि. १७ ऑक्टोबर रोजी पदयात्रा सुरू होऊन गुरूदत्त, जवाहर, घोरपडे, शाहू, वारणा, क्रांती, वसंतदादा, राजारामबापू आदी ३७ साखर कारखान्यांवर २२ दिवस ५२२ किमी पदयात्रा चालत जाऊन ७ नोव्हेंबर रोजी जयसिंगपूर येथील ऊस परिषदेत ही पदयात्रा सामील होणार आहे.
शेतकऱ्यांच्या घरची भाजी- भाकरी खाऊन आंदोलन…
प्रत्येक ठिकाणी घरटी भाकरी गोळा करून तेथील शेतकऱ्यांनी जेवणाची सोय केली आहे. प्रत्येक गावात पदयात्रेचे जल्लोषी स्वागत केले जात आहे. जोपर्यंत ४०० रूपयांचा हप्ता दिला जात नाही. तोपर्यंत एकाही साखर कारखान्याची ऊस तोड सुरू होणार नसल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. पदयात्रेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सामील व्हावे, असे आवाहन शेट्टी यांनी केले आहे.