नंदूरबार : शहादा तालुक्यात पाण्याची उपलब्धता पाहता बहुतांश बागायतदार शेतकऱ्यांनी पूर्वहंगामी व सुरू हंगामातील उसाची लागवड केली आहे. तालुक्यात सुमारे ११ हजार हेक्टरवर ऊस पीक आहे. मात्र, सध्या सततच्या पावसाने ऊस पिकात तण वाढले आहे. गवत, तणामुळे पिकात रोगराई देखील आहे. पांढरी माशी व अन्य समस्या पिकात दिसत आहेत. तण काढण्यासाठी मजूर मिळत नसल्याने तणनाशकांचा वापर वाढला आहे.
अॅग्रोवनमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, खानदेशातील ऊस लागवडीत शहादा तालुका आघाडी घेत आहे. नंदुरबारमध्ये सुमारे १५ हजार हेक्टरवर ऊस पीक आहे. शहादा तालुक्यात मध्यंतरी ऊस पीक क्षेत्र चार ते सहा हजार हेक्टरदरम्यान होते. आता शेतीमालाला खर्चाच्या तुलनेने मिळणारे कवडीमोल दर पाहून शेतकऱ्यांनी ऊस लागवडीला पसंती दिली आहे. पिकाची वाढ चांगली झाली. परंतु त्यात आता तण वाढले आहे. कारण पाऊस सतत सुरू आहे. तापी, दरा, गोमाई, सातपुडा क्षेत्रातही ऊस पीक आहे. सर्वच भागात पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे पिकात विविध समस्याही आल्या आहेत. पावसाने ऊस उत्पादकांचे उत्पादन व अन्य बाबींचे गणित बिघडवले आहे.