कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील दानोळी, कोथळी, निमशिरगाव, कवठेसारसह परिसरात आडसाली ऊसावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. खास करून को – २६५ जातीच्या उसावर हा प्रादुर्भाव दिसत आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. काही ठिकाणी उसाची पाने पिवळी पडून त्यावर लाल ठिपके पडत आहेत. याशिवाय आताच भरणी केलेल्या ऊस पिकावरही रोगाचा फैलाव झाल्याचे दिसून येत आहे.
दानोळी परिसरात मोठ्या प्रमाणावर ऊस उत्पादन घेतले जाते. यात को-२६५ आणि ८६०३२ या वाणांचा समावेश आहे. मात्र, अलीकडेच भरणी केलेल्या उसावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे. ढगाळ वातावरण आणि वाढती थंडी यामुळे पिकांची वाढ थांबली आहे. आडसाली उसाची साधारणत: जुलै आणि ऑगस्ट या कालावधीत लागवड केली जाते. बियाण्याच्या उसाचा दर अधिक असल्याने एकरी ५० ते ६० हजार रुपये खर्च येतो. यंदा उन्हाळ्यात शेतकऱ्यांना पाणी टंचाईने हैराण केले. तारेवरची कसरत करून शेतकरी ऊस पिक जगवत असताना रोगाचा फैलाव दिसून लागल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.