कोलंबो : चीनी मंडी
जागतिक बाजारपेठेत आणि भारतीय बाजारात वाढलेल्या साखरेच्या दरांमुळे श्रीलंकेच्या साखर आयातदार संघटनेने आयात तात्पुरती थांबविली आहे. या संदर्भात असोसिएशनचे सदस्य प्रियनाथ सेनावर्थने यांनी माहिती दिली. साखरेची आयात थांबल्यामुळे श्रीलंकेत सणासुदीच्या काळात साखरेचा तुटवडा जाणवण्याची भीती आहे.
ते म्हणाले, ‘भारतीय बाजारात एक टन साखरेची किंमत सुमारे ३४० डॉलर आहे. लंडनच्या बाजारात ४०० डॉलर तर न्यूयॉर्कच्या बाजारात ३९० डॉलर आहे.’ साखर आयातदारांच्या म्हणण्यानुसार, त्यांना कस्मट टॅक्स ४४.५० भरावा लागतो. त्याचबरोबर बंदरातून माल उतरवून घेताना ५८.५० तसेच ट्रान्सपोर्ट आणि सेवा करही ३.०० भरावा लागतो. एक किलो साखर आयात करण्यासाठी आम्हाला १०६ एनपीआर खर्च करावे लागतात. श्रीलंका सरकारने साखरेवरच्या करप्रणालीमध्ये बदल केला तेव्हा भारतीय बाजारात साखरेचे दर प्रति टन ३०० डॉलर होते. आता हाच दर ३४० डॉलरपर्यंत गेल्याचे सेनावर्थने यांनी सांगितले.
साखर आयात करताना म्हाला १४ एनपीआर तोटा सहन करावा लागतो आहे. त्यामुळेच आम्ही सध्या साखरेची आयात काही काळासाठी बंद केली आहे. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत श्रीलंकन रुपयाची झालेली घसरण, या तोट्याला कारणीभूत ठरत आहे.
सेनावर्थने म्हणाले, ‘आमच्या असोसिएशनने देशाच्या अर्थमंत्र्यांशी या विषयावर चर्चा केली आहे. जर, श्रीलंका सरकार साखरेच्या आयातीवरील कर कमी करत असेल, तर सरकारच्या नियंत्रणाखालील किमतीवर साखर जारी करू.’
साखरेची आयात थांबल्यामुळे श्रीलंकेत सणासुदीच्या काळात साखरेचा तुटवडा जाणवण्याची भीती सेनावर्थने यांनी व्यक्त केली. श्रीलंकेत सरासरी महिन्याला ५० हजार टन साखरेची मागणी असते. पण, येत्या काही दिवसांत सणावार असल्यामुळे ही मागणी दुप्पट होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी श्रीलंकेत सध्या एक महिनापुरेल इतकाच साखर साठा आहे, अशी माहिती सेनावर्थने यांनी दिली.