कोलंबो : मोठे आर्थिक संकट आणि उलथा पालथीनंतर श्रीलंकेचे विरोधी पक्षनेते साजिथ प्रेमदासा यांनी पंतप्रधान नरंद्र मोदी यांना आपल्या देशाला अधिक मदत करण्याची विनंती केली आहे. एएनआयशी बोलताना साजिथ प्रेमदासा म्हणाले की, श्रीलंकेला भारताने यथाशक्ती मदत करावी. ही आमची मातृभूमी आहे. तिला वाचविण्याची गरज आहे. श्रीलंकेला परकीय चलनाच्या मोठ्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे खाद्य, अन्नधान्य, इंधन आयातीवर परिणाम झाला आहे. त्यातून देशाला विज कपातीला सामोरे जावे लागले आहे. जीवनावश्यक वस्तूंसाठी श्रीलंकेला मित्र देशांचे सहाय्य घ्यावे लागले आहे. भारताने श्रीलंकेतील विजेचे संकट कमी करण्यासाठी शनिवारी ४०,००० मेट्रिक टन डिझेल पुरवठा केला.
साजिथ प्रेमदासा यांनी कॅबिनेट मंत्र्यांनी दिलेल्या राजीनाम्याला नाटक असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, देशातील जनतेला मुर्ख बनविण्यासाठी हे नाटक केले जात आहे. लोकांना दिलासा देण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले गेलेले नाहीत. लोकांची फसवणूक सुरू आहे. निवडणुकीत सहभागी होण्याबाबत प्रतिक्रीया देताना प्रेमदासा म्हणाले की, ते आणि त्यांचा पक्ष निवडणूक लढण्यासाठी तयार आहेत. विरोधी पक्षांच्या मागण्या मांडताना ते म्हणाले, लोकांना तत्काळ दिलासा देण्याची गरज आहे. आपण लोकांच्या जीवनाची आणि अधिकारांचे रक्षण केले पाहिजे. श्रीलंकेला अन्नधान्य, इंधन टंचाईने आर्थिक संकटात टाकले आहे. त्याचा फटका बसलेल्यांची संख्या अधिक आहे. कोविड महामारीनंतर अर्थव्यवस्था घसरणीला लागली आहे.