पुणे : लवकरच माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक जाहीर होईल. मागील निवडणुकीत सभासदांनी जेवढ्या विश्वासाने माझ्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ निवडून दिले, त्याच विश्वासाने माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे, विद्यमान अध्यक्ष ॲड. केशवराव जगताप यांनी राज्यात विक्रमी ऊस दर दिला. गतवर्षी राज्यात प्रथम क्रमांकाचा प्रतिटन ३६३६, तर यंदा ३१३२ रुपये ॲडव्हान्स दर दिला आहे. आता केंद्र व राज्य सरकार आपल्या विचारांचे आहे. त्यामुळे माळेगावचा सर्वांगीण विकास करण्यात मी कमी पडणार नाही. कार्यकर्त्यांनी निवडणूक तयारीला लागावे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. कारखाना कार्यस्थळावर नूतनीकरण झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते.
अजित पवार म्हणाले की, कारखान्याची निवडणूक तोंडावर आली आहे. बाळासाहेब तावरे, मदनराव देवकाते, अॅड. केशवराव जगताप या ज्येष्ठांनी एकत्र बसून सहा गटात कोणाला आगामी निवडणुकीत उमेदवारी द्यायची, हे ठरवावे. नवीन चेहऱ्यांना संधी देण्याबरोबरच जुन्या संचालक मंडळात कोणाला पुन्हा संधी द्यायची, हे ठरविणे सोपे जाईल. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे, ॲड. केशवराव जगताप, उपाध्यक्ष राजेंद्र ढवाण, ज्येष्ठ संचालक बाळासाहेब तावरे, संचालक तानाजी देवकाते, अनिल तावरे, मदनराव देवकाते, योगेश जगताप, तानाजी देवकाते, नितीन सातव आदी उपस्थित होते. प्रा. अनिल धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले. मदनराव देवकाते यांनी आभार मानले.