पाकिस्तानकडील परकीय चलन साठा वेगाने कमी होत आहे. त्यामुळे पाकिस्तानची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या या देशात महागाईने लोकांचे जगणे कठीण केले आहे. कांद्यापासून आट्यापर्यंत सर्वच वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. लोकांना दूध-तांदूळसुद्धा मिळने अवघड झाले आहे. अशा परीस्थितीत समोर आलेल्या आकडेवारीने भयावह स्थिती स्पष्ट केली आहे.
आजतकमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, देशातील सर्व प्रांतातील मोठ्या शहरांमध्ये आट्यासाठी गोंधळ सुरू आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले व्हिडीओ आणि छायाचित्रे पाहता लोकांना भाकरीसाठी जीव धोक्यात घालावा लागत असल्याचे दिसून येत आहे. देशात मैद्याची किंमत १५० रुपये किलोवर पोहोचली आहे. पाकिस्तान ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्स (पीबीएस) च्या ताज्या आकडेवारीवर नजर टाकली तर देशातील महागाईचे चित्र स्पष्ट होते. डिसेंबर २०२१ मध्ये १२.३० टक्क्यांच्या तुलनेत डिसेंबर २०२२ मध्ये चलनवाढीचा दर जवळपास दुप्पट होऊन २४.५ टक्के झाला आहे. विशेषत: खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे आकडेवारीत ही वाढ दिसून आली आहे. एका वर्षातच पाकिस्तानमधील अन्नधान्य महागाईचा दर ११.७ टक्क्यांवरून ३२.७ टक्क्यांवर पोहोचला आहे.