कोल्हापूर : श्री शाहू साखर कारखान्याचे संस्थापक-अध्यक्ष विक्रमसिंह घाटगे यांनी साखर कारखानदारीत दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेत पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने त्यांच्या नावे राज्यस्तरीय पुरस्कार सुरू केला आहे. देशात सहकारी तत्त्वावरील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना म्हणून शाहू कारखान्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तांत्रिकदृष्ट्या सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या साखर कारखान्यास दरवर्षी ‘स्व. राजे विक्रमसिंह घाटगे उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी दिली.
यावेळी उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, माजी मंत्री वीरकुमार पाटील, सर्व संचालक व कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण उपस्थित होते. घाटगे म्हणाले विक्रमसिंह घाटगेंच्या साखर उद्योगातील कामगिरीची दखल घेऊन त्यांच्या नावे एखादा पुरस्कार सुरू करावा, अशी मागणी राज्यपातळीवर होत होती. ती पूर्ण झाली आहे. विक्रमसिंह घाटगे यांनी शाहू कारखान्याची अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्थापना केली. १२५० मे. टन गाळप क्षमतेवर सुरू झालेला हा कारखाना आता ८००० मे. टन दैनंदिन गाळप करीत असल्याचे ते म्हणाले.
शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी विक्रमसिंह घाटगे म्हणाल्या कि, छत्रपती शाहू महाराज यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून विक्रमसिंह घाटगे यांनी सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी कामगार यांचे हित जोपासण्यासाठी उभी हयात खर्च केली. राजर्षी शाहूंचे जिवंत स्मारक म्हणून साखर कारखाना जोपासला. त्यांच्या नावाच्या या पुरस्कारामुळे इतर कारखान्यांना प्रोत्साहन मिळणार आहे. समरजित घाटगे म्हणाले कि, विक्रमसिंह घाटगेंच्या नावे कार्यक्षमता पुरस्कार सुरु होणे अभिमानास्पद गोष्ट आहे.