हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
पुणे : चीनी मंडी
उसाच्या झालेल्या बंपर उत्पादनामुळे यंदा राज्यातील साखर हंगाम लांबण्याची शक्यता आहे. १५ एप्रिलपर्यंत साखर कारखाने सुरू राहतील अशी शक्यता आहे. या वर्षी, २०१८-१९च्या गाळप हंगामात सुमारे ९५२ लाख टन उसाचे गाळप अपेक्षित आहे. राज्यात आतापर्यंत ९३३ लाख टन ऊस गाळप झाले.
यंदा गेल्या वर्षीच्या साखर उत्पादनाचा विक्रम मोडीत निघेल अशी स्थिती आहे. यंदाचा ऊस हंगाम मार्च अखेरीस संपेल, असा अंदाज सुरुवातीला बांधण्यात येत होता. राज्यातील पाण्याची टंचाई, दुष्काळी स्थिती, उसावर झालेला विविध किडींचा प्रादुर्भाव यामुळे लवकरच साखर कारखाने बंद होतील, असे सांगितले जात असताना अद्याप ६३ साखर कारखान्यांमध्ये उसाचे गाळप सुरू आहे. तर १३२ साखर कारखान्यांचे गाळप बंद झाले आहे. उसाचा सरासरी उतारा ११.२१ टक्के असून तब्बल १०४.५८ लाख टन साखर उत्पादन झाले आहे.
गेल्या वर्षी १०७ लाख टन साखर उत्पादन झाले होते. यंदा त्यापेक्षा विक्रमी साखर उत्पादन होईल अशी शक्यता आहे. सद्यस्थितीत पुणे विभागात १८, सोलापूर विभागात ४३, कोल्हापूर विभागात ११, अहमदनगर विभागात ११, औरंगाबाद विभागात १३ आणि नांदेड विभागातील १४ कारखाने बंद झाले आहेत. अमरावती विभागातील दोन्ही कारखाने बंद झाले असून नागपूर विभागातील चार साखर कारखाने अद्याप सुरू आहेत.
गेल्या वर्षीच्या हंगामात, २०१७-१८ मध्ये १०७ लाख टन साखर उत्पादन झाले होते. यंदा अद्याप १९ लाख टन उसाचे गाळप शिल्लक आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत साखर उत्पादन कमी असले तरी शिल्लक ऊस पाहता हा विक्रम सहज मोडला जाईल असे साखर सहसंचालक (विकास) दत्तात्रय गायकवाड यांनी सांगितले.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp