देशभरात खाद्यान्न सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या आपल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून राष्ट्रीय राजधानीतील विविध राज्ये, केंद्रशासित प्रदेश यांचे भवन आणि सरकारी कार्यालयांच्या खाद्यगृहांमध्ये अन्न हाताळणाऱ्यांना भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) खाद्यान्न प्रमाणन (फॉस्टॅक,FoSTaC) सुरक्षा प्रशिक्षण देत आहे.
नियामक मंडळाने आतापर्यंत नवी दिल्लीतील बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र आणि सिक्कीमसह चार भवनांमध्ये प्रशिक्षण सत्रे आयोजित केली असून, त्याद्वारे या भवनांच्या सर्व खाद्यपदार्थ हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण दिले गेले आहे. याव्यतिरिक्त, नॉर्थ ब्लॉक मधील कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने(DoPT),देखील प्रशिक्षण आयोजित केले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमांचा उद्देश राज्य/केंद्र शासित प्रदेश यांची भवन आणि सरकारी कार्यालयीन इमारतींच्या खाद्यगृहांमध्ये अन्न सुरक्षा मानके वाढवणे हा आहे.
हा उपक्रम जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री यांनी दिनांक 7 जून 2023 रोजी केलेल्या “पुढील 3 वर्षांत FSSAI द्वारे 25 लाख खाद्य व्यवसाय ऑपरेटरना प्रशिक्षण” या घोषणेच्या अनुषंगाने राबविण्यात येत आहे.
पार्श्वभूमी:
FoSTaC हा एक प्रमुख उपक्रम,भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने खाद्यान्न व्यवसायात गुंतलेल्या अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी तयार केलेला आहे. राष्ट्रीय राजधानीतील विविध राज्ये, केंद्रशासित प्रदेश यांचे भवन आणि सरकारी कार्यालयांच्या खाद्यान्न उद्योगांतील या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये अन्न सुरक्षा नियम,वैयक्तिक स्वच्छता, ऍलर्जी(अनपेक्षित अभिक्रिया) व्यवस्थापन, अन्नकार्यवाही आणि नियंत्रण, दस्तऐवजीकरण आणि नोंदीसंपादन, नामनिर्देशन, आणि या क्षेत्रातील विविध उदयोन्मुख प्रशिक्षण पद्धती यासह विविध विषयांचा समावेश होतो.प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या सहभागींना भारतभर मान्यताप्राप्त अन्न सुरक्षा पर्यवेक्षक (FSS) प्रमाणपत्र दिले जाईल. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये, देशभरात फॉस्टक(FoSTaC) कार्यक्रमांतर्गत एकूण 3,58,224 खाद्यान्न हाताळणाऱ्यांना हे प्रशिक्षण आतापर्यंत देण्यात आले आहे.
(Source: PIB)