प्रत्येक विधानसभा निवडणुकीत मीच उमेदवार पाहिजे, हा विरोधकांप्रमाणे माझा स्वभाव नाही. कुकडी कारखाना समोर ठेवून या निवडणुकीतून थांबलो. याचा अर्थ असा नाही की मी राजकारण सोडलेले नाही, पुढच्या निवडणुकीत मीच आहे, असा इशारा आमदार राहुल जगताप यांनी विरोधकांना दिला.
पिंपळगापिसे येथे कार्यकर्त्यांच्या आयोजित केलेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस होते. राष्ट्रवादी उमेदवार घनश्याम शेलार, अरुण पाचपुते, दीपक भोसले यांच्यासह अनेक नेते यावेळी उपस्थित होते. यावेळी जगताप म्हणाले, पाच वर्ष सन्मानाने आमदारकी सांभाळली. केवळ थापा मारण्यापेक्षा काम करण्यावर भर दिला. त्याची प्रसिद्धी करण्यात भलेही कमी पडलो. मात्र, कामे झाली नाही असे एकही गाव नाही. मी कुठल्याही चौकशीला घाबरून निवडणुकीतून माघार घेतलेली नाही.
कारखाना आणि आमदारकी दोन्हीकडे लक्ष देताना वेळ मिळत नव्हता. (स्व) कुंडलिकराव जगताप यांनी मोठ्या संघर्षातून उभा केलेला कुकडी कारखाना नुसता टिकवायचा नाही, तर शेतकर्यांना जास्तीचा बाजार द्यायचा यासाठी कारखान्याकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला. घनश्याम शेलार यांच्यासारखा खंबीर नेता उमेदवार असल्याने मी थांबण्याचा निर्णय घेतला. ते पुढे म्हणाले, मी संपलो नसून, यापुढच्या सगळ्या निवडणुकात त्यांचा विरोधक मीच आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे.
कारखान्याने सगळी देणी चुकती केली असून, 180 कोटी रुपयांची साखर अजूनही विक्रीअभावी पडुन आहे. या सगळ्या अडचणीतून मार्ग काढून तालुक्यातील शेतकर्यांना न्याय देण्यासाठी आपण कमी पडणार नाही. पस्तीस वर्षे ज्यांनी तालुक्यावर राज्य केलं, त्यांनी केलेले काम आणि माझ्या काळात झालेली काम याची तुलना करूनच शेलार यांच्या पाठीमागे सामान्य कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी उभे राहावे. मी सत्तेतून बंगले आणि कारखाने नाही, तर लोकांचे आशीर्वाद कमवले, याचा विरोधकांनी विसर पडू देऊ नये.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.