सोलापूर : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना करकंब येथील युनिट परिसरात बुधवारी (दि. २२ मे) सायंकाळी अचानक झालेल्या वादळी वारे व जोरदार पावसामुळे कारखान्याच्या आणि गोडवूनवरील पत्रे उडाले. त्यामुळे आच्छादनाची मोडतोड झाली. जोरदार पावसामुळे २५ ते ३० हजार क्विंटल साखर भिजून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालेले आहे. या वस्तुस्थितीचा तातडीने पंचनामा करावा, अशी मागणी कारखान्याच्यावतीने करण्यात येत आहे. पावसाने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष आ. बबनदादा शिंदे व कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे यांनी दिली.
जोरदार पावसाने युनिट दोनच्या मुख्य इमारतीवरील पत्रे उडाले. वादळी वाऱ्यामुळे गोडारूनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यापाठोपाठ आलेल्या पावसामुळे सुमारे २५ ते ३० हजार क्विंटल साखर भिजली आहे. या नुकसानीची माहिती समजताच कारखान्याचे संचालक व जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे, कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे, जनरल मॅनेजर सुहास यादव, शेतकी अधिकारी, सुरक्षा अधिकारी व इतर संबंधितांनी येऊन पाहणी केली.