सांगली : राजारामबापू कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात ऊस तोडणी व वाहतुकीचे काटेकोर नियोजन केले आहे. हंगामाबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी राहणार नाहीत. त्यातूनही काही अडचणी आल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा. मी त्या अडचणी सोडवेन, असे आश्वासन कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी दिले. बिचुद, दुधारी, ताकारी या गावांतून सुरू केलेल्या पहिल्या सभासद संपर्क दौऱ्यात ते बोलत होते.
कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर पाटील यांनी प्रथमच ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. अध्यक्ष पाटील म्हणाले की, ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांनी कोणालाही पैसे देऊ नयेत. जर कोणी पैसे मागितल्यास तक्रार करा. शेतकऱ्यांचे पैसे परत देण्याची व्यवस्था करू. गावनिहाय नोंदीप्रमाणे तोडणीचे नियोजन आम्ही केले आहे. यावेळी मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील यांनी गावनिहाय यंत्रणेची माहिती दिली. ऊस विकास अधिकारी सुजय पाटील यांनी कारखान्याच्या योजनांची माहिती दिली. उपाध्यक्ष विजयराव पाटील, संचालक विठ्ठल पाटील, बाळासाहेब पवार, देवराज पाटील, दादासाहेब मोरे, विनायकराव पाटील, अर्जुन पाटील, राजाराम पाटील, संभाजी पाटील, आनंदराव लकेसर, आदी उपस्थित होते.