मुंबई : चीनी मंडी
पुढचा साखर हंगाम तोंडावर आला, तरी महाराष्ट्रातील साखर कारखान्यांकडे अजूनही शेतकऱ्यांची थकबाकी आहे. कारखान्यांकडे एकूण ४३७ कोटी रुपयांची थकबाकी असून, संबंधित कारखान्यांवर कारवाई करण्याचा इशारा साखर आयुक्तांनी दिला आहे. साखर आयुक्त संभाजी कडू पाटील म्हणाले, ‘आम्ही थकबाकीदार कारखान्यांवर कडक कारवाई करण्याची तयारी केली आहे.’ यामुळे सरकारला संबंधित कारखान्यांकडील साखर स्टॉक आणि कारखान्याची मालमत्ता ताब्यात घेता येणार आहे.
पाटील यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकबाकी ही देशाच्या एकूण थकबाकीच्या केवळ ५ टक्के आहे. साखरेचे सर्वाधिक उत्पादन होणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांची थकबाकी मोठ्या प्रमाणावर आहे.मात्र, देशात इतर राज्यांमध्ये असणाऱ्या एफआरपीपेक्षा उत्तर प्रदेशात उसाचा दर जास्त आहे.
देशात आणि जगात झालेल्या साखरेच्या अतिरिक्त उत्पादनामुळे २०१७-१८मध्ये साखरेचे दर मोठ्या प्रमाणावर घसरले आहेत. साखर उद्योगासाठी केंद्राने जूनमध्ये ७ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते. यात साखरेची किमान आधारभूत किंमत २९ रुपये ठरवणे आणि साखर निर्यातीसाठी प्रोत्साहन अनुदान देण्यात आले आहे. या पॅकेजचा महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना चांगला लाभ झाला, अशी माहिती पाटील यांनी दिली.
त्याचवेळी पुढच्या हंगामातही अतिरिक्त साखर उत्पादन होण्याची शक्यता असल्याने त्याविषयी चिंता व्यक्त करण्यात आली आहे. ‘इस्मा’ने आगामी हंगामात साखर उत्पादन ८ ते दहा टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या ३२२ लाख टन उत्पादनाच्या तुलनेत येत्या हंगामात ३५५ लाख टन उत्पादन होण्याचा इस्माचा अंदाज आहे. यात उत्तर प्रदेशात ९ ते १२ तर महाराष्ट्रात ३ ते ८ टक्क्यांनी उत्पादन वाढण्याची शक्यता आहे.
येत्या हंगामात भारतात जगातील सर्वाधिक साखर उत्पादन होण्याची इस्माचा अंदाज आहे. याबाबत इस्माचे डायरेक्टर जनरल अभिलाष शर्मा म्हणाले, ‘भारतात ३५० ते ३५५ लाख टन साखरेचे उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. त्यातून १०२ लाख टन साखरेचा साठा होईल. साखर कारखान्यांच्या साठवणूक क्षमतेपेक्षाही जास्त साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे.’
महाराष्ट्रात उसावर कीड लागण्याचा अंदाज असल्याने साखरेचे उत्पादन ३२० लाख टनावरून केवळ ३३० लाख टनापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. पण, गेल्या वर्षीपेक्षा जास्त उत्पादन ही निश्चितच चिंतेची बाब आहे. उपलब्ध साठ्याची निर्यात व्हावी आणि साखरेचे दर घसरणार नाहीत, यासाठी केंद्राने पुढाकार घ्यावा.
– प्रकाश नाईकनवरे, एमडी, दी नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज्