कोल्हापूर : गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना व्यवस्थापन आणि कामगार यांच्यातील थकीत पगार, थकीत भविष्य निर्वाह निधी, हंगामी कामगारांचा रिटेन्शन अलाउन्स याबाबतची बोलणी फिस्कटल्याने मंगळवारपासून (११ जुलै २०२३) कामबंद आंदोलन सुरु करण्याचा निर्णय साखर कामगार संघाने घेतला आहे. याबाबतचे निवेदन कारखान्याचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक यांना देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे कि, मे २०२१ ते मे २०२३ अखेरचा कामगारांचा पगार थकीत आहे. ऑक्टोबर २०२० पासून मे २०२३ पर्यंतची कामगारांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरलेली नाही. हंगामी कर्मचाऱ्यांना तीन वर्षांचा रिटेन्शन अलाउन्स आणि त्यावरील भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळालेली नाही. आर्थिक अडचणीत सापडलेल्या कामगारांना थकीत पगारापैकी ७ पगार आणि चालू हंगामातील थकीत पगारापैकी ५ पगार द्यावेत, भविष्य निर्वाह निधीची रक्कम तातडीने भरावी, हंगामी कामगारांचा वर्षाचा रिटेन्शन अलाउन्स द्यावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदनावर साखर कामगार संघाचे अध्यक्ष विजय रेडेकर, उपाध्यक्ष श्रीकांत नार्वेकर, अरुण शेरेगार, सुरेश कुब्बुरी, भाऊसाहेब पाटील आदींच्या सह्या आहेत.