कोल्हापूर : यंदाच्या हंगामात ऊसदरासाठी आंदोलनाची गरजच भासणार नाही, अशी स्थिती आहे. कमी उसामुळे साखर कारखानदारांसमोर गाळप उद्दिष्टपूर्तीचे आव्हान असेल. ऊस उत्पादन घटल्याने कारखानदारांमध्ये पहिली उचल जाहीर करण्याचीही चढाओढ होणार आहे. इचलकरंजी येथील पंचगंगा रेणुका शुगर्सने सर्वाधिक प्रती टन ३,३०० रुपये देण्याचे जाहीर केले आहे. इतर कारखान्यांनाही तीन दिवसांत बिल थेट खात्यावर जमा करण्याचे जाहीर केले आहे. आगामी काळात उसाच्या पळवापळवीला जोर येईल अशी शक्यता आहे.
आसुर्ले – पोर्ले येथील दालमिया शुगर्स कारखान्याने यंदा अवघ्या ४८ तासांत म्हणजे तिसऱ्या दिवशी ऊस बिल थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले आहे. यापूर्वी साखर कारखान्याने थेट वजन काट्यावरच ऊस बिल दिले होते. ऊस बिले देण्याची ही चढाओढ पाहता इतर साखर कारखान्यांनाही वेळेवर बिले आदा करावी लागणार आहेत. पावसाने मारलेली दडी, दुष्काळसदृश्य स्थितीमुळे ऊस उत्पादनात घट झाली आहे. कृषी विभागाने कोल्हापूर विभागात सुमारे २ कोटी ६७ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होईल, असा अंदाज वर्तवला होता. मात्र उद्दिष्टपूर्तीचे खरे आव्हान साखर कारखानदारांसमोर असणार आहे.
याबाबत साखर उद्योग तज्ज्ञ विजय औताडे म्हणाले की, ऊस उत्पादन घटल्याने यंदा साखर कारखान्यांची गाळप उद्दिष्टपूर्ती होणार नाही. जर उद्दिष्ट पूर्ण नाही झाले तर उत्पादन खर्च वाढून साखर कारखाने तोट्यात जाणार आहेत. केवळ ९० ते १०० दिवसच हंगाम चालणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील म्हणाले की, गेल्या १२ वर्षांत प्रथमच यंदा उसाला एफआरपीपेक्षा जादा दर मिळाला आहे. चालू हंगामातील उसाला एफआरपी अधिक शंभर रुपये, अशी पहिली उचल देण्यात येणार आहे. यंदा उसाचे मार्केटिंग करण्याची संधी शेतकऱ्याला मिळेल.