कोल्हापूर : राज्यात ऊसतोडणी यंत्रावर (हार्वेस्टर) अनुदान देण्याबाबत राज्य सरकार लवकरच निर्णय घेईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखाने यांना सातत्याने ऊसतोड मजुरांचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे सध्या मशागत आणि ऊतोडणीसाठी मजूर मिळत नाहीत. त्यामुळेच शेती औजारांचा वापर केला पाहिजे असे ते म्हणाले. येथे भीमा कृषी व पशू, पक्षी प्रदर्शनाच्या समारोप समारंभात ते बोलत होते. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील प्रमुख उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाचा विकास होत आहे. अशावेळी महाराष्ट्रही मागे राहता कामा नये. प्रत्येक जिल्ह्यात अशी प्रदर्शने होतील यासाठी जिल्हा नियोजनमधून निधी देण्याबाबत निर्णय घेऊ. खासदार धनंजय महाडिक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, इथेनॉल प्रकल्पामुळे शेतकरी आणि साखर कारखान्यांना चांगली मदत होत आहे. मात्र, आर्थिक अडचणीमुळे मर्यादा येत आहेत. राज्य शासनाने इथेनॉल प्रकल्पांसाठी हमी देऊन बँकांनी मदत केल्यास हे प्रकल्प मार्गी लागून देशासाठी राज्यातील प्रकल्प पथदर्शक ठरतील. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्काराने गौरविण्यात आले. कार्यक्रमास पालकमंत्री हसन मुश्रीफ, आ. राजेश पाटील, माजी आम. के. पी. पाटील, माजी आमदार अमल महाडिक, अरुंधती महाडिक, राहुल चिकोडे, सत्यजित कदम, पृथ्वीराज महाडिक, विश्वराज महाडिक उपस्थित होते. कृष्णराज महाडिक यांनी आभार मानले.