साखर आणि इथेनॉल कारखान्यांनाही इथेनॉल पंप सुरू करण्याची परवानगी दिली जाईल: मंत्री गडकरी

नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, भारत सरकारने 400 इथेनॉल पंप सुरू करण्यास परवानगी दिली आहे. इंडियन ऑईल देशभरात 400 पंप सुरू करत आहे. मी पेट्रोलियम मंत्रालयाला इथेनॉल कारखान्यांना इथेनॉल पंप सुरू करण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे. आम्ही आमच्या भागातील साखर आणि इथेनॉल कारखान्यांना इथेनॉल पंप सुरू करण्याची परवानगी देणार आहोत. येत्या काही दिवसांत दुचाकी आणि गाड्या शंभर टक्के इथेनॉलवर चालतील. त्यामुळे प्रदूषणाला आळा बसेल, आणि आयातीवर खर्च होणाऱ्या कोट्यवधी रुपयांची बचत होईल.

महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील अशोक सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाचे मंत्री गडकरी यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना मंत्री गडकरी म्हणाले की, आम्ही देशात मोठ्या प्रमाणावर इथेनॉलचे उत्पादन सुरू केले आहे. C मोलॅसेस, B हेवी मोलॅसेस आणि उसाच्या रसापासून इथेनॉलचे उत्पादन केले जाते. आता तर आम्ही गहू, तांदूळ, मका इत्यादीपासून इथेनॉलचे उत्पादन करत आहोत. एवढेच नाही तर आम्ही आसाममधील नुमानीगडमध्ये बांबूपासून इथेनॉलचे उत्पादन घेतले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री गडकरी म्हणाले, दरवर्षी आपण पेट्रोल आणि डिझेल आयात करण्यासाठी सुमारे 16 लाख कोटी रुपये खर्च करतो. गेल्या काही वर्षांत देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्न निर्माण झाला होता. या समस्येला तोंड देण्यात इथेनॉल उत्पादनाने मोठी भूमिका बजावली आहे. इथेनॉल उत्पादनामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस बिले वेळेत देण्यात कारखान्यांना यश आले आहे. ते पुढे म्हणाले की, सध्या देशात एफआरपी वाढत आहे, मात्र साखरेचे भाव तेवढे वाढत नाहीत. त्यातच साखर निर्यातीवर बंदी आहे. त्यामुळे साखर कारखानदारी चालवणे कठीण झाले आहे.

मंत्री गडकरी म्हणाले, अशोक सहकारी साखर कारखान्याच्या प्रकल्पात पेंट वॉश जाळण्यात येणार असून या पेंट वॉशमधून पोटॅश निर्माण होणार आहे. आपण आपल्या देशात पोटॅश मोठ्या प्रमाणात आयात करतो. जर आपल्या देशात 60 ते 70 पोटॅश उत्पादक कारखाने उभारले तर आपल्या देशातील शेतकऱ्यांना आपण जे खत देतो, त्यात आवश्यक असणाऱ्या पोटॅशची आयात करण्याची गरज भासणार नाही. आगामी काळात आपण देशात इथेनॉलचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करणार आहोत.त्यामुळे आपली ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होईल. यावेळी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here