हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
कोल्हापुर : चीनी मंडी
करिअरची सुरुवात एका खासगी कंपनीत केमिकल इंजिनीअर म्हणून केली. म्हटलं तर सगळं व्यवस्थित सुरू होतं. काही वर्षे काम केल्यानंतर अगदी फॅक्टरी मॅनेजरपर्यंत पदोन्नती मिळाली. पण,स्वतःचा काही तरी व्यवसाय सुरू करण्याची इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती. सुरुवातीला ऊस, साखर आणि इतर वनस्पतींपासून तयार करण्यात येणाऱ्या ऑक्सॅलिक अॅसिडची निर्यात सुरू केली. त्यानंतर साखरेची निर्यात सुरू केली.
सध्या या निर्यातदार कंपनीची उलाढाल १ हजार कोटींच्या पलिकडे आहे आणि याच साखर निर्यातदार व्यापाऱ्याने एक साखर कारखानाही चालवण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतलाय. मानसिंग खोराटे, असं या जिगरबाज, उद्योजकाचं नाव आहे. मूळचे कोल्हापूरचे असणारे खोराटे यांनी आता जिल्ह्यातील हलकर्णी येथील दौलत साखर कारखाना ३९ वर्षांसाठी चालवण्यासाठी घेतला आहे. एका दूरदृष्टी असलेल्या उद्योजकाने हा साखर करखाना चालवायला घेतल्यामुळे कोल्हापूरच्या साखर उद्योगातून या निर्णयाचे स्वागत होत आहे.
गेल्या काही वर्षांपासून देशातील साखर उद्योग हा अतिरिक्त उत्पादन आणि घसरलेल्या साखरेच्या दरांमुळे संकटात सापडला आहे. साखर उद्योगातील बड्या आसामींनीही मोठे निर्णय घेण्याचे टाळले आहे. कारण, साखरेतून फारसा नफा किंवा फायदा होत नसल्याची चर्चा साखर उद्योगातूनच होऊ लागली आहे. या काळात टिकाव धरणेही मुश्किल असल्याचं साखर उद्योगातून बोललं जात आहे. अशा परिस्थितती खोराटे यांनी एक महत्त्वाकांक्षी निर्णय घेऊन साखर उद्योगाचे लक्ष वेधले आहे. या पार्श्वभूमीवर खोराटे यांनी ChiniMandi.com ला विशेष मुलाखत दिली.
दूरदृष्टी असलेले उद्योजक म्हणून तुमच्याकडे पाहिले जाते. पण, कोणत्या इतर गोष्टींनी तुम्हाला हा मोठा निर्णय घेण्याची प्रेरणा दिली.?, या प्रश्नावर खोराटे म्हणाले, ‘ मी मुळचा केमिकल इंजिनीअर. माझे ज्ञान आणि अनुभव मी माझ्या स्वतःचा कारखाना चालवण्यासाठी करावा, अशी सूप्त इच्छा पहिल्यापासूनच होती. साखर उद्योगातील माझ्या प्रवासासोबत माझे हे स्वप्न पाहणे सुरूच होते. साखर उद्योगातील माझ्या या स्वप्नाला बळ दिले आणि हा कारखाना चालवण्यासाठी घेण्याचा आत्मविश्वासही दिला. त्याचबरोबर कारखान्यातील कामगारांचा पाठिंबा, कारखान्याच्या सभोवताली उपलब्ध असणारा ऊस, कारखान्यातील उत्तम यंत्रसामुग्री अशा अनेक गोष्टींमुळे मी हा निर्णय घेतला आहे.’
दौलत साखर कारखाना चालवताना तुम्ही कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्याल? या प्रश्नावर खोराटे म्हणाले, ‘मुळात साखर उद्योग हा प्रामुख्याने एक अस्थिर उद्योग आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावे लागतात आणि तेच निर्णायक ठरतात. कारखाना चालवताना बिले भागवली नाही म्हणून, पुरवठा थांबला, अशी परिस्थिती उद्भवणार नाही, याकडे मी प्राधान्याने लक्ष देणार आहे. माझे वैयक्तिक हित आणि माझ्या जबाबदाऱ्या लांब ठेवण्याचा मी प्रयत्न करेन.’
येत्या पाच ते दहा वर्षांत तुम्ही कारखाना कुठे असेल, असे तुम्हाला वाटते? त्यावर सध्याची परिस्थिती ही साखर कारखान्यांसाठी फारशी चांगली नाही, हे माहिती असल्याचे खोराटे यांनी मान्य केले. ते म्हणाले, ‘साखर कारखान्यांपुढे कॅश फ्लोची समस्या आहे. बँकांचे बरेच विषय आहेत. देशभरात ऊस बिल थकबाकीचा डोंगर उभा राहिला आहे. सहकारी साखर कारखान्यांचा विचार केला तर, तेथे निर्णय क्षमतेचा अभाव दिसत आहे. त्यामुळे कारखान्यांच्या हिताला बाधा पोहचत आहे. दुसरीकडे खासगी साखर कारखाने मात्र चांगले चालत आहेत. दुसरीकडे आपला उद्योग हा भावनेवर जास्त चालतो हे माझ्या लक्षात आले आहे. त्यामुळेच तवा गरम आहे तोपर्यंत भाकरी भाजून घ्यावी, असे मला वाटते.’ सध्याची चार हजार टन गाळपाची कारखान्याची क्षमता वाढवण्याचा इरादा असल्याचे खोराटे यांनी स्पष्ट केले. तसेच सध्याच्या डिस्टलरीला इथेनॉल उत्पादन युनिट करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. खोराटे म्हणाले, ‘सरकार सध्या इथेनॉलच्या खरेदी संदर्भात काही चांगले निर्णय घेत आहे. इथेनॉलचा खरेदी दर वाढवण्यात आला आहे. अल्कोहोल तसेच पेट्रोलमध्ये मिश्रणासाठी इथेनॉलची मागणी वाढत आहे. त्याचबरोबर डिस्टलरी असलेल्या साखर कारखान्यांना चांगले भविष्य असल्याचे माझे वैयक्तिक मत आहे.’
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp