हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
मेरठ (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशात यंदा ऊस गाळप हंगाम थोडा उशिरा सुरू झाला. परिणामी एप्रिलचा तिसरा आठवडा सुरू झाला तरी, मेरठ परिक्षेत्रात अजून दीड कोटी क्विंटल ऊस गाळपाच्या प्रतीक्षेत आहे. मलकपूर, दौराला, सिंभावली, मवाना कारखाना क्षेत्रात सर्वाधिक ऊस शिल्लक आहे. बुलंदशहर कारखाना क्षेत्रातील ऊस संपला असून, सकौती, मोहिउद्दीनपूर, अनूपशहर कारखाना क्षेत्रात कमी ऊस शिल्लक आहे.
उन्हाचा वाढता तडाखा आणि कारखाने बंद करण्याच्या येत असलेल्या सूचना यांमुळे शेतकऱ्यांत ऊस कारखान्याला देण्याची स्पर्धा तीव्र झाली आहे. मोठे शेतकरी आपला ऊस निकाली काढू लागले असले तरी, छोट्या शेतकऱ्यांना कारखान्याची पावती मिळूनही त्यांचा ऊस उचलला जात नसल्याचे दिसत आहे. दुसरीकडे या परिस्थितीवर अधिकाऱ्यांनीही स्पष्टीकरण दिले आहे. शेतांमधील ऊस संपल्याशिवाय कारखाने बंद केले जाणार नाहीत, असे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
दर वर्षी एप्रिल महिन्यात ऊस गाळप हंगामाचा शेवट होतो. गेल्या दोन वर्षांत उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे गाळप हंगामा मे महिन्यापर्यंत चालत आहे. गेल्या वर्ष उशिरा सुरू झालेला मोहिउद्दीनपूर साखर कारखाना १५ जूनपर्यंत चालला होता. यंदा एप्रिलचा तिसरा आठवडा आला तरी, उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी ऊसच ऊस दिसत आहे. पारा ४० अंशांच्या वर गेला आहे. दुसरीकडे ऊस तोडणीसाठी आलेले मजूर आता गहू कापणीसाठी जाऊ लागले आहेत. त्यामुळे आपला ऊस शेतातच पडून राहील, अशी भीती स्थानिक शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. त्यामुळे लवकरात लवकर ऊस तोडला जाईल, यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. मोठे शेतकरी गैरमार्गाने आपला ऊस जमा करत आहेत. तर, दुसरीकडे छोट्या शेतकऱ्यांना पावती मिळूनही त्यांच्या उसाचे वजन होत नसल्याचा प्रकार समोर आला आहे.
उसाची स्थिती पाहून ऊस आयुक्तालयातील अधिकारी रोज ऊस क्षेत्राची पाहणी करून अहवाल देत आहेत. साखर उपायुक्त जिल्ह्यातील सर्व ऊस अधिकाऱ्यांकडून अहवाल घेऊन वरिष्ठ पातळीवर पाठवत आहेत.
प्राथमिक सर्वेक्षणातून मेरठ परिक्षेत्रात जवळपास दीड कोटी क्विंटल ऊस शिल्लक आहे. शेतकरी शिल्लक उसामुळे चिंतेत असले तरी, त्यांनी काळजी करू नये. परीक्षेत्रातील सगळा ऊस संपल्याखेरीज कारखाने बंद होणार नाहीत – हरपाल सिंह, साखर उपायुक्त मेरठ परिक्षेत्र