हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
पुणे : चीनीमंडी
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील माखणी येथील गंगाखेड शुगर व पाथरी तालुक्यातील योगेश्वरी साखर कारखान्याला साखर आयुक्तांनी ऊस बिल थखबाकी देण्यासंदर्भात आदेश दिले आहेत. दोन्ही कारखान्यांची मिळून ४६ कोटी ८३ लाख थकबाकी असून, ती थकबाकी १५ टक्के व्याजासह शेतकऱ्यांना देण्याचे आदेश साखर आयुक्तालयाने काढले आहेत.
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शुगर आणि योगेश्वरी साखर कारखान्याची उसाची बिले चार महिने थकीत आहेत. त्यामुळे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली कदम, क्रांतीसिंह नाना पाटील ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी नांदकिले, सुभाष कदम यांनी पुण्यात साखर आयुक्तालयाबाहेर आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार आंदोलन केल्यानंतर शिष्टमंडळाने साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेऊन ऊस बिल थकबाकीची परिस्थिती सांगितली.
गंगाखेड शुगर साखर कारखान्याकडून ३२ कोटी १ लाख ९५ हजार तर, योगेश्वरी शुगरकडून १४ कोटी ८१ लाख ५० हजार रुपये थकीत आहेत. त्यामुळे कारखान्याला ऊस दिलेल्या शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. कारखान्यांकडून जमीन महसुलाची थकबाकी समजून कारखान्याची साखर, मळी, बगॅस यांची विक्री करुन त्यातून एफआरपीची रक्कम वसूल करावी, असे आदेश साखर आयुक्तालयाने दिले आहेत. ऊस नियंत्रण कायद्यानुसार थकीत रकमेवर थकबाकीच्या काळातील १५ टक्के व्याज शेतकऱ्यांना द्यावे, असेही साखर आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे. त्यामुळे आता थकबाकी असलेल्या ऊस उत्पादकांना पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दोन्ही कारखान्यांकडून उसाची थकित एफआरपीची रक्कम मिळावी, यासाठी शेतकऱ्यांनी गेल्या आठवड्यात गंगाखेड येथे बैठक घेतली होती. त्याच बैठकीत थकीत एफआरपीप्रकरणी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला सुदैवाने साखर आयुक्तांनीदेखील त्याची गंभीर दखल घेतल्याने थकबाकीचा प्रश्न मार्गी लागला.