अहमदनगर : चीनी मंडी
पश्चिम महाराष्ट्रात महापुरमुळे ऊस शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सांगली, कोल्हापुरात यंदा ऊस गाळप हंगामापुढे प्रश्न चिन्ह आहे. दुसरीकडे नगर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे ऊस लागवणच कमी झाली आहे. परिणामी उसाच्या कमी उपलब्धतेमुळे यंदाचा हंगाम पूर्ण होण्याची शक्यता कमी दिसत आहे. दर वर्षी साधारणपणे १६० दिवस चालणारा हंगाम यंदा जेमतेम शंभर दिवसांच्या आसपास चालेल तर, काही साखर कारखाने कसे तरी ५० दिवस चालतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रातच नव्हे तर देशात उसाचे क्षेत्र वाढले. त्यामुळे कारखान्यांना मुबलक ऊस उपलब्ध झाला आणि साखरेचे अतिरिक्त उत्पादन झाले. पण, यंदाचा हंगाम वेगळ्या आव्हानांचा आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याच्या उपलब्धते अभावी उसाचे क्षेत्रच घटले आहे. शेतकऱ्यांनी उसाऐवजी दुसऱ्या कमी पाण्यावरच्या पिकांची निवड केली आहे. तर, काही ठिकाणचा उपलब्ध ऊस दुष्काळी भागात चारा छावण्यांना पाठवण्यात आला आहे. त्यामुळे एकूणच उसाची कमतरता जाणवणार आहे. नगर जिल्ह्यात जवळपास पाचशे चारा छावण्या सुरू होत्या. त्यात जवळपास ३ लाखांहून अधिक जनावरे होती. अजूनही जिल्ह्याच्या पूर्व भागात शंभरावर चारा छावण्या सुरू आहेत. या चारा छावण्यांसाठी मोठ्या प्रमाणावर उसाची तोड झाली आहे. कमी वाढ झालेल्या उसाला शेतकऱ्यांनी छावण्यांमध्ये पाठवले आहे.
साखर आयुक्तालय आणि साखर कारखान्यांच्या बैठकीत ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून गाळप हंगाम सुरू करण्याचा विचार सुरू आहे. परंतु, उसाची उपलब्धत कामी आणि पाणी कमी झाल्याने उतारा कमी, अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात एक कोटी क्विंटल साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा ते ६५ लाख क्विंटलच्या आसपास होण्याची शक्यता आहे. ऊसच कमी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे तोडणी मंजुरांचे रोजगार नुकसान होणार आहे. नगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या साखर कारखान्यांनी थोरात, संजीवनी, मुळा, गंगामाई, ज्ञानेश्वर साखर कारखाने दोन अडीच महिने चालतील. पण, काही कारखाने केवळ ४०-५० दिवसच गाळप करण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातीलच नव्हे तर, राज्यात साखरेचा मोठ्या प्रमाणावर साठा आहे. त्यामुळे तो साठाच विक्री करण्याचे साखर कारखान्यांचे नियोजन असणार आहे. सध्या साखरेचा दर ३३०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत गेला आहे. सणासुदीच्या दिवसांत आणखी चांगला दर मिळण्याची शक्यता असल्यामुळे कारखान शिल्लक साठा बाहेर काढणार आहेत.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.