पुणे : चीनी मंडी
यंदाच्या साखर हंगामात ५० लाख टन साखर निर्यात करण्याचे टार्गेट केंद्र सरकारने ठेवले असताना, आतापर्यंत केवळ १५ लाख टन साखरच निर्यात झाल्याचे समोर आले आहे. साखर निर्यात केली नाही तर, देशातील साखर उद्योगापुढे अडचणी वाढणार आहेत. त्यामुळे निर्यातीवरून साखर उद्योगात चिंतेचे वातावरण आहे.
निर्यातीचा कोटा जाहीर करूनही देशातील अनेक कारखाने साखर निर्यातीसाठी अनुकूल नाहीत. निर्यातीमध्ये मोठ्या प्रमाणावर अडथळे असल्याचे कारखान्यांचे मत आहे. हे अडथळे पहिल्यांदा दूर करायला हवेत, अशी त्यांची बाजू आहे. तर, दुसरीकडे साखर निर्यात न करणाऱ्या कारखान्यांवर कारवाईची मागणीही होऊ लागली आहे.
निर्यात कोटा असूनही त्यात टाळाटाळ करणाऱ्या कारखान्यांमुळे देशात साठा वाढला आहे. त्यामुळे एकूण साखर उद्योगच अडचणीत आला आहे. आता या परिस्थितीला जबाबदार कारखान्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी पंतप्रधान कार्यालयाकडे करण्यात आल्याचे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले.
‘साखर निर्यात झालीच पाहिजे’
साखर निर्यातीबाबत महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी गांभीर इशारा दिला आहे. ते म्हणाले, ‘साखर निर्यात झाली नाही तर, अडचणी वाढत जातील. त्यामुळे कोट्यानुसार साखर निर्यात झालीच पाहिजे. अन्यथा साखरेचा साठा वाढत जाईल आणि दर २८०० रुपये क्विंटलपेक्षाही खाली जाण्याचा धोका आहे. त्याचवेळी कारखान्यांना निर्यातीमध्ये असणारे अडथळेही दूर केले पाहिजेत.’
डाउनलोड करा चिनीमण्डी न्यूज ऐप: http://bit.ly/ChiniMandiApp