नवी दिल्ली : भारत आणि इराण या दोन देशांतील द्विपक्षीय व्यापारासाठी इतर चलनाच्या वापराबाबत चर्चा सुरू असल्याचे केंद्र सरकारने बुधवारी स्पष्ट केले. लवकरच ही समस्या सोडविली जाण्याची अपेक्षा आहे.
इराणकडे भारतीय चलन साठ्यातील कमतरतेमुळे साखरेसारख्या वस्तूंच्या निर्यातीत घट झाली आहे. साखर, चहा, तांदूळ अशा शेतीशी संबंधीत वस्तूंची निर्यात जवळजवळ बंद झाली आहे. निर्यातदाराना वेळेवर पैसे मिळत नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. भारतामध्ये यूको आणि आयडीबीआय बँकेकडे इराणच्या चलनाचा साठा खूप कमी झाला आहे.
पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इराणसोबत आमची चर्चा सुरू असल्याचे खाद्य सचिव सुधांशू पांडे यांनी सांगितले. विदेश मंत्रालयाकडून बोलणी सुरू आहेत. आम्हाला लवकरच यामध्ये यश येण्याची अपेक्षा आहे. आम्ही एप्रिलपर्यंत या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करीत आहोत असे पांडे म्हणाले. दोन्ही देश कोणत्या इतर चलनाला मान्यता दिली जाऊ शकते यावर चर्चा करीत आहोत. त्यातून बँकांच्या माध्यमातून द्विपक्षीय व्यापारास मान्यता मिळू शकेल.
पांडे म्हणाले, एप्रिल अखेरपर्यंत यातून मार्ग काढला जाईल अशी शक्यता आहे. त्यानंतर निर्यात सुरू होऊ शकेल. इराणला साखरेची गरज आहे. भारत साखरेची चांगली निर्यात करू शकतो. दरही चांगले असून वाहतूक खर्च कमी आहे. गेल्यावर्षी इराणने भारताकडून ११ लाख टन साखर आयात केली होती. देशाच्या एकूण निर्यातीत हा सहावा हिस्सा आहे असे पांडे यांनी सांगितले.