नवी दिल्ली : साखरेच्या दरात जागतिक स्तरावर झालेल्या घसरणीमुळे नव्याने निर्यातीचे करार करण्यास कारखानदारत अनुत्सुक असल्याचे दिसून येत आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) दिलेल्या माहितीनुसार, निर्यातदारांनी २०२१-२२ या हंगामात ३५ लाख टन साखर निर्यातीचे करार केले होते. यातील बहूतांश करार आधी करण्यात आले आहेत. त्या कालावधीत साखरेच्या किमती २० ते २१ सेंट प्रती पाऊंड होत्या. तर सध्या साखरेचे दर १८.६ सेंट झाले आहेत. दुसरीकडे देशांतर्गत २४ लाख टन साखर विक्री कोट्याच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये एकूण विक्री २४.५० लाख टन झाली आहे. कोविडच्या निर्बंधांमध्ये देण्यात आलेली सवलत, साखरेचा चढा विक्री कोटा, उत्सवाच्या कालावधीत वाढलेली मागणी आदी कारणांमुळे साखर विक्री वाढल्याचे दिसून येत आहे.
याबाबत इस्माने सांगितले की, ३० नोव्हेंबरअखेर देशात ४१६ साखर कारखाने सुरू झाले आहेत. त्यांनी ४७.२१ लाख टन साखर उत्पादित केली आहे. तर गेल्यावर्षी याच कालावधीत ४०९ कारखान्यांनी ४३.०२ लाख टन साखर उत्पादन केले. इंधन वितरण कंपन्यांनी डिसेंबर २०२१-नोव्हेंबर २०२२ या हंगामात ४५९ कोटी लिटर इथेनॉल पुरवठ्यासाठी इथेनॉल उत्पादकांकडून निविदा मागविल्या होत्या. यामध्ये साखर उद्योगाने ३३३ कोटी लिटर बी हेवी शिरा आणि उसाच्या रसापासून फीडस्टॉकच्या रुपात सादर केल्या आहेत. ओएमसींकडून ३१७ कोटी लिटर इथेनॉल पुरवठ्यासाठी इथेनॉल उत्पादकांसोबत करार करण्यासाठीची प्रक्रिया केली असून १४२ कोटी लिटरसाठी दुसरा ईओआय करण्यात येत आहे.