‘भीमाशंकर’चा साखर उतारा १२ टक्के : साडेबारा लाख साखर पोती उत्पादन, हंगामाची सांगता

पुणे : पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने २०२४-२५ मधील गाळप हंगामात ११ लाख ३८ हजार ४९६ टन ऊस गाळप केले. सरासरी १२. ०० टक्के साखर उताऱ्याने १२ लाख ५५ हजार १४९ साखर पोत्यांचे उत्पादन करून कारखान्याने हंगामाची यशस्वी सांगता केली. हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी आभार व्यक्त केले.

यावेळी अध्यक्ष बेडे म्हणाले की, कारखान्याचे संस्थापक संचालक व महाराष्ट्र राज्याचे माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व संचालक मंडळाच्या सहकायनि तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियोजनाने गाळप हंगाम यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. सहवीज निर्मिती प्रकल्पाद्वारे आजअखेर सात कोटी ३४ लाख ७३ हजार युनिट उत्पादन करून कारखाना वापर वजा जाता तीन कोटी ६५ लाख ४५ हजार युनिट वीज वितरण कंपनीला निर्यात केली आहे.

सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी वाहतूक कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकायनि यंदाच्या गाळप हंगामात कोणतीही अडचण न येता गाळप हंगाम यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. हंगामात ट्रकने जास्तीत जास्त वाहतूक करणारे वाहतूकदार निशा किशोर घाडगे, ट्रॅक्टरने ऊस वाहतूक करणारे वाहतूकदार विलास चिमाजी गाडगे, ट्रॅक्टरजोडने जास्तीत जास्त ऊस वाहतूक करणारे गाडीवान चुनीलाल नवल पवार, टायरबैलगाडीने ऊस वाहतूक करणारे गाडीवान अजिनाथ मारुती सकुंडे, ऊस तोड करणारे कंत्राटदार विलास चिमाजी गाडगे, हार्वेस्टरने अधिकाधिक ऊस तोडणी करणारे कंत्राटदार अनिता राजेंद्र सरवदे व हार्वेस्टच्या मागील वाहनाने ऊस वाहतूक करणारे प्रणय संजय दरेकर यांचा सांगता समारंभानिमित्त सत्कार करण्यात आला.

मुख्य शेतकी अधिकारी दिलीप कुरकुटे, राजेश वाकचौरे, कामगार कल्याण अधिकारी सुरेश शिंदे, ब्रिजेश लोहोट, ऊस पुरवठा अधिकारी दिनकर आदक, सोमेश्वर दिक्षित, सुरक्षा अधिकारी कैलास गाढवे तसेच ऊस वाहतूकदार, ऊसतोड मुकादम, ऊस तोडणी मजूर, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here