पुणे : बारामती येथील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने जागतिक संस्थांच्या सहयोगाने विकसित केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित काटेकोर शेती तंत्रज्ञानामुळे उत्पादकता वाढीची संधी कारखान्यांना मिळणार आहे. याशिवाय, साखर उताऱ्यातही लक्षणीय वाढ शक्य आहे. या तंत्रज्ञानाच्या प्रात्यक्षिक क्षेत्राची पाहणी करण्यासाठी राज्यातील साखर कारखान्यांच्या ऊस विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात येत आहे.
परवडणाऱ्या ऊस शेतीसाठी ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने मायक्रोसॉफ्ट, ऑक्स्फर्ड विद्यापीठ व ॲग्री पायलट एआय या जागतिक संस्थांच्या सहयोगाने कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित काटेकोर शेती तंत्रज्ञान विकसित केले आहे. पहिल्या टप्प्यात ऊस उत्पादन वाढीचे प्रात्यक्षिक निवडक ५०० शेतकऱ्यांच्या शेतावर येत्या आडसाली हंगामात घेतले जाणार आहे. त्यासाठी शेतकरी निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. साखर कारखान्यांच्या ऊस विकास विभागांसाठीही हे तंत्रज्ञान खुले केले जाणार आहे. त्यासाठी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ऊस प्रक्षेत्राची शिवारफेरी, चर्चा आणि तज्ज्ञांकडून शंकानिरसन सत्र असा एक दिवसाचा निःशुल्क उपक्रम बारामतीत राबविला जाणार आहे.