कोल्हापूर : चीनी मंडी
बाजारात कोसळलेले साखरेचे दर आणि शेतकरी संघटनांनी यंदाच्या हंगामासाठी मागितलेला दर यांची सांगड घातला येत नसल्याने कोल्हापुरातील साखर कारखान्यांनी काम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी शेतकरी संघटना आण जय शिवराय किसान मोर्चा या संघटनांनी गेल्या वर्षीच्या बिलातील शेतकऱ्यांचे २०० रुपये दिल्यानंतरच कारखाने सुरू करण्याची परवानी द्यावी, अशी मागणी मोर्चा द्वारे केली आहे. त्यामुळे साखर कारखाने दुहेरी संकटात सापडले आहेत.
गेल्या वर्षीच्या हंगामातील थकबाकीचा प्रश्न उत्तर प्रदेशच्या तुलनेत महाराष्ट्रात फारसा तीव्र नसला, तरी तो पूर्ण मिटलेला नाही. गेल्या हंगामात एफआरपी अधिक २०० रुपये असे सूत्र ठरले होते. राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठक घेऊन एफआरपी अधिक २०० रुपये हे सूत्र मान्य केले होते. मात्र, गेल्या वर्षीच्या बिलातील २०० रुपये न दिल्यामुळे शेतकऱ्यांनी मोर्चाद्वारे या उर्वरीत बिलाची मागणी केली आहे. त्यानंतरच कारखाने सुरू करावेत, अशी या संघटनांची मागणी आहे. यंदाच्या ऊस दराविषयी साखर कारखान्यांच्या बैठका सुरू असताना, थकीत बिलाचाही मुद्दा पुढे आल्याने कारखान्यांपुढे दुहेरी पेच निर्माण झाला आहे.
७०:३० सूत्रानुसार कारखान्यांच्या नफ्यातील हिस्सा शेतकऱ्यांनाही मिळावा, अशी जय शिवराव किसान मोर्चाचे अध्यक्ष शिवाजी माने यांची मागणी आहे. गेल्यावेळचे २०० रुपये त्वरीत मिळावेत आणि यंदा रिकव्हरी बेसवरच दर मिळावा, अशी मागणी माने यांनी कोल्हापुरातील मोर्चामध्ये केली आहे. तर, गेल्या वर्षीच्या सूत्रानुसार साडे बारा टक्के रिकव्हरी धरली, तर अंतिम दर ३ हजार २५० येतो. या दराचे पूर्ण बिल देऊन मगच यंदाच्या हंगामासाठी कारखाने सुरू करावेत, अशी भूमिका शेतकरी संघटनेचे रघुनाथ पाटील यांनी मांडली आहे.
स्वाभिमानीची सांगलीत तीव्र आंदोलन
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस दरासाठी कोल्हापूरसह सांगलीतही आंदोलन सुरू केले आहे. त्यात सांगलीतील आंदोलनाची धार अधिक तीव्र आहे. राज्य सरकारकडून ऊस दराबाबत तोडगा निघेपर्यंत साखर कारखाने बंद ठेवावेत, यासाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी साखर कारखान्यांवर धडक दिली आहे. शनिवारी कार्यकर्त्यांनी हुतात्मा, राजारामबापू, क्रांती, सोनहिरा या कारखान्यांवर धडक दिली, तर रविवारी वसंतदादा दत्त इंडिया, मोहनराव शिंदे, महाकाली या कारखान्यांवर कार्यकर्त्यांनी धडक दिली.