चीनी मंडी, कोल्हापूर: महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचा लाभ आणि साखर उद्योगाच्या सशक्तीकरणाकरिता विचार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सध्या बंद असलेले राज्यातील आजारी साखर कारखाने पुन्हा सुरु करण्याकरिता उपाययोजना सुरु केल्या आहेत. येणाऱ्या काळात आजारी साखर कारखान्यांची विक्री न करता हे कारखाने भाडेतत्त्वावर सुरु करण्याबाबतचे धोरण राज्य सरकारने स्वीकारले आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीकरिता मंत्रालयात हालचाली सुरु झाल्या आहेत.
बंद असलेल्या कारखान्यांवर राज्य सहकारी बँक व काही जिल्हा बँकांचे कर्ज आहे. त्यांच्या कर्जाचे पुनः संगठन व जादा निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याचे कळते. यानुसार आता ‘नाबार्ड’ आणि राज्य शासनाच्या मदतीने राज्य बँकेकडून स्वतंत्र योजना आखण्यात येणार आहे.
राज्यात एकूण ८५ खाजगी व १२० सहकारी साखर कारखाने असून त्यापैकी अनेक कारखाने काही कारणास्तव बंद आहेत. त्याचा संबंधित जिल्ह्यातील उद्योगांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झालेला आहे. ग्रामीण भागात याच कारखान्यावर गावकऱ्यांचे पोट असल्याने त्यांचे आर्थिक स्वास्थ्य बिघडले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आता बंद कारखाने भाडेतत्वावर देऊन ते सुरु करण्याचा निर्णय घेतला असून यामुळे आजारी व बंद साखर कारखान्यांच्या संचालक मंडळांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.