पुणे : चीनी मंडी जागतिक बाजारपेठेतील साखरेच्या दरांची स्थिती आणि साखर निर्मितीसाठी वाढत असलेला खर्च याचा परिणाम साखर कारखान्यांवर होणार आहे. कारखान्यांना प्रति क्विंटल ४०० रुपयांचा तोटा सहन करावा लागेल, अशी भीती माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सभेत ते बोलत होते. आपल्या भाषणात त्यांनी जागातील साखरेची बाजारपेठ आणि देशातील तसेच महाराष्ट्रातील साखर कारखान्यांची स्थिती याविषयी विस्तृत विश्लेषण मांडले. कारखान्यांना एफआरपी देणे अवघड जात आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. यातून मार्ग काढण्यासाठी आता सरकारी मदत झाली पाहिजे, असे मत पवार यांनी यावेळी व्यक्त केले.
पवार म्हणाले, ‘सध्या देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर घसरलेले आहेत. साखरेचा भाव प्रतिक्विंटल २ हजार ९०० आहे. भविष्यातही या परिस्थितीत लवकर सुधारणा होईल, असे दिसत नाही. साखर कारखान्यांना प्रति क्विंटल उत्पादन खर्च ३ हजार ३०० रुपये येतो. त्यामुळे क्विंटलमागे ४०० रुपये होणार असल्याचे दिसत आहे.’
केंद्रीय अन्न मंत्र्यांनी दिलेल्या माहितीचा हवाला देत पवार यांनी सांगितले की, आपल्या देशात २०१७-१८च्या हंगामात ३२२ लाख टन साखर तयार झाली. त्यातील २५६ लाख टन साखरेची विक्री झाली. गेल्या हंगामाप्रमाणे यंदाही देशात उच्चांकी साखर उत्पादन होणार असून, ३१५ लाख टन तयार होईल. परिणामी देशात पुन्हा अतिरिक्त साखर तयार होणार आहे. याचा निश्चितच साखरेच्या बाजारपेठेवर परिणाम होईल.
साखर उद्योग महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. तो सांभाळण्याची गरज आहे. सध्या
केंद्राने साखर निर्यात वाहतूक अनुदान दिले आहे. तर, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब सरकार कारखान्यांना एफआरपी देण्यासाठी मदत करत आहे. त्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेदेखील कारखान्यांना मदत केली पाहिजे, अशी भूमिका पवार यांनी मांडली.
इथेनॉलची कास धरा
थेट उसाच्या रसापासून इथेनॉल तयार व्हावे, यासाठी केंद्राने घोषणा केलेल्या निर्णयांचे पवार यांनी यावेळी स्वागत केले. त्या योजनांच्या पार्श्वूभूमीवर साखर कारखान्यांनी जुन्या प्रकल्पांचे आधुनिकीकरण करून घ्यावे. केंद्राकडून अर्थपुरवठा होत असल्याने प्रकल्प नसल्यास कारखान्यांनी तो उभारावा आणि शेतकऱ्यांना दोन पैसे जादा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा, असा सल्ला पवार यांनी या वेळी दिला.
शरद पवार उवाच
– इथेनॉलसाठी प्रकल्पांचे आधुनिकीकरण करा
– खोडवा उत्पादनावर लक्ष केंद्रित करा
– उसाची गुणवत्ता, उतारा वाढविण्यासाठी प्रयत्न करा
– ऊस उत्पादनवाढीसाठी आवश्यक पावले उचला
– ऊस उत्पादनवाढीच्या स्पर्धांमधील सहभाग वाढवा