मुंबई : थकीत कर्जामुळे ताब्यात घेतलेल्या साखर कारखान्यांची विक्री न करता ते भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय राज्य सहकारी बँकेने घेतला आहे. यामध्ये बंद कारखान्यांच्या अत्याधुनिकीकरणाचा खर्चसुद्धा भाडेत्त्वावर घेणाऱ्या कंपनीलाच करायचा आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील अशा दोन कारखान्यांचा करार बँकेने अलिकडेच केला.
बाजारातील अडचणी, चुकीचे व्यवस्थापन अथवा अन्य कारणांमुळे संकटात येऊन कर्ज थकीत झालेले २५ साखर कारखाने महाराष्टÑ राज्य सहकारी बँकेने ताब्यात घेतले आहेत. हे कारखाने बंद पडल्याने परिसरातील ऊस उत्पादक शेतकºयांचे नुकसान होत आहे. यावर मात करण्यासाठी कारखान्यांची खासगी कंपन्यांना विक्री न करता ते भाडेतत्त्वावर देण्याची योजना राज्य सरकारने आखली. त्यासंबंधी सहकार विभाग, महाराष्टÑ सहकारी विकास मंडळाचे प्रतिनिधी, बँकेच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, सदस्य अविनाश महागांवकर व संजय भेंडे यांच्यात बैठक झाली. त्यामध्ये प्रारंभी बाणगंगा व भाऊसाहेब बिराजदार हे दोन साखर कारखाने २० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय झाला.
बँकेच्या प्रशासकीय समितीचे सदस्य संजय भेंडे यांनी सांगितले की, काही कारखाने बंद असल्याने यंत्रसामग्रींचे अत्याधुनिकीरण करावे लागणार आहे. तसेच अन्य काही कामे करायची असल्यास त्याचा खर्च कारखाना भाडेतत्त्वावर घेणाºयांनीच करावा, असे करारात नमूद असेल. त्यासाठी येणाºया भांडवली खर्चाचा परतावा संबंधित कंपनीला मिळावा यासाठीच हा करार २० वर्षांसाठी केला जात आहे. पुढील हंगामापर्यंत आणखी पाच ते सात कारखाने अशाप्रकारे सुरू होऊन शेतकºयांच्या उसाला हक्काचे स्थान मिळावे, असा प्रयत्न केला जात आहे.