कोल्हापूर : देशातील साखर कारखान्यांकडून मार्चच्या पहिल्या आठवडाअखेर ऊस उत्पादक शेतकऱ्यांची १५,५०४ कोटी रुपयांची ऊस बिले थकवले आहेत. एकूण देय रकमेपैकी ८० टक्के रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. सन २०२१- २२ ते २०२४- २५ या कालावधीतील ही रक्कम आहे. तर गेल्या तीन वर्षातील २९१ कोटी रुपये थकीत आहेत. शेतकऱ्यांची थकबाकी राखण्यात उत्तर प्रदेश आघाडीवर आहे. उत्तर प्रदेशने ४७९३ कोटी रुपये शेतकऱ्यांचे थकविले आहेत. त्या खालोखाल कर्नाटकची ३३९५ कोटी रुपयांची, तर महाराष्ट्राची २९४९ कोटी रुपयांची थकबाकी आहे.
कर्नाटकच्या कारखान्यांनी सध्याचा सुरू हंगाम वगळता मागील तिन्ही वर्षांतील एक रुपयाही थकबाकी ठेवलेली नाही. गुजरात व पंजाब वगळता तमिळनाडू, बिहार, हरियाना, मध्य प्रदेश, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, तेलंगणा छत्तीसगड आदी राज्यातील कारखान्यांनी यंदाचा हंगाम मागील सर्व हंगामांतील शेतकऱ्यांची देणी दिली आहेत. याउलट उत्तर प्रदेशने मात्र गेल्या तीन वर्षांची पूर्ण रक्कम अजूनही देण्यात आलेली नाही. महाराष्ट्रातील कारखान्यांची २०२१-२२ चे ३२ कोटी, २०२२-२३ चे १ कोटी तर २०२३ २४ ची ७ कोटी रुपयांची देणी अद्याप शिल्लक आहेत. गुजरात मध्ये २०२३-२४ ची ८ कोटी तर पंजाबची २०२१- २२ ची २८ कोटी रुपयांची देणी शिल्लक आहेत.