लातूर : शेतकऱ्यांचे ऊस वेळेत तोडण्यासाठी कारखान्यांनी योग्य नियोजन करावे, कारखाने पूर्ण क्षमतेने चालवून परिसरातील सर्व शेतकऱ्यांच्या उसाचे वेळेत गाळप करावे, अशा सूचना मांजरा परिवाराचे मार्गदर्शक, माजीमंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी मांजरा परिवारातील साखर कारखान्यांच्या प्रशासनाला केल्या.
यावर्षीचा सर्वच कारखान्यांचा गळीत हंगाम अधिक क्षमतेने चालविण्यासाठी चांगली तयारी केली आहे. यासाठी लागणारी आवश्यक तोडणी, वाहतूक यंत्रणा सज्ज केली. नोव्हेंबर-डिंसेबरनंतर परतीचा उसाला फायदा झाला, उसाचे एकरी उत्पादनही वाढल्याचे दिसून येते. या काळातील अवकाळी पावसामुळे काही काळ गळीत हंगामास व्यत्यय आला. सध्या हंगाम गतीने सुरू आहे. मात्र कारखाना क्षमता अधिक असून यासाठी अधिकची यंत्रणा लागत आहे. ही स्थिती पाहता या हंगामासाठी राहिलेल्या उसाचे वेळेवर गाळप करण्यासाठी अधिकची यंत्रणा वाढवून उसाचे लवकर गाळप करावे, अशा सूचना कारखाना प्रशासनाला दिल्या आहेत.