पुणे : चीनी मंडी चीनच्या बाजारपेठेत साखर निर्यात करण्याची चांगली संधी आता भारतातील साखर कारखान्यांकडे आहे. यासाठी साखर कारखान्यांनी निर्यातदारांच्या संपर्कात रहायला हवे तसेच ते किती साखर निर्यात करू शकतील याची हमी त्यांनी द्यायला पाहिजे. कारण, चीन सरकार जानेवारीमध्ये त्यांना लागणारा निर्यात कोटा जाहीर करेल आणि त्यासाठी लवकरात लवकर करार करून घेता येतील, असे मत महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खटाळ यांनी चीनी मंडी न्यूजशी बोलताना व्यक्त केले.
सध्या चीनच्या साखर विभागाचे शिष्टमंडळ भारत दौऱ्यावर आहे. दिल्लीतील बैठकांनंतर त्यांनी उत्तर प्रदेशला भेट दिली आहे. सध्या शिष्टमंडळ महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. भारतातील साखर कारखान्यांनी यंदा चीनला २० लाख टन साखर निर्यात करण्यासाठी कंबर कसली आहे. तसेच भविष्यातही चीनची बाजारपेठ आपल्यासाठी खुली ठेवण्याचा मानस आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चीनच्या शिष्टमंडळाने आज, महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यात वाळवा येथे राजारामबापू सहकारी साखर कारखान्याला भेट दिली. शिष्टमंडळातील व्यापारी रिफायनरीजचे प्रतिनिधी यांचे समाधान करण्यात महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना यश आले आहे.
या संदर्भात खटाळ म्हणाले, ‘चीनचे शिष्टमंडळ महाराष्ट्रातील ऊस लागवड प्रक्रियेविषयी खूपच प्रभावित झाले आहेत. भारतातून साखर आयात करण्याचा निर्णय योग्य असल्याचे त्यांचे मत आहे. त्यांनी भारताकडून साखर आयात करण्याला अप्रत्यक्षपणे हिरवा कंदिल दिला आहे. आता ही महत्त्वाची वेळ आहे. साखर कारखान्यांनी आता निर्यातदारांच्या सतत संपर्कात राहून त्यांना किती साखर निर्यात करू शकतो, याची माहिती दिली पाहिजे. त्याची हमी दिली पाहिजे. जेणे करून चीन सरकारने जानेवारीत त्यांना लागणारा साखर कोटा जाहीर केल्यास लगेच निर्यात करार करणे शक्य होईल.’