लातूर : मराठवाडा, विदर्भात साखर कारखानदारी वाढवायची असेल तर जलसंधारणाच्या कामास प्राधान्य द्यायला हवे. लातूर जिल्ह्यात साखर कारखानदारी असल्याने कारखान्यांनी जलसंधारणाची कामे हाती घ्यावीत व लोकप्रतिनीधींनीही या कामास प्रथम पसंती द्यावी, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
मंत्री गडकरी यांच्या हस्ते येथील शिवलिंग शिवाचार्य महाराज भक्तीस्थळावर राष्ट्रीय महामार्ग ३६१ औसा ते चाकूर, चाकूर ते लोहा या कामाचे चौपदरीकरण व राष्ट्रीय महामार्ग ६३ आष्टामोड ते उदगीर या कामाचे लोकार्पण यांसह विविध रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात आले. मंत्री गडकरी म्हणाले की, इथेनॉलवर चालणारी वाहने लवकरच बाजारात येणार आहेत. मग खऱ्या अर्थाने शेतकरी समृद्धी झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी साखर कारखानदारांनीही प्रयत्न करायला हवेत. जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य द्यायला हवे.
यावेळी राज्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे, खासदार सुधाकर शृंगारे, खासदार प्रताप पाटील-चिखलीकर, माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव, आमदार बाबासाहेब पाटील, रमेश आप्पा कराड, अभिमन्यू पवार, रत्नाकर गुट्टे, वर्षा ठाकूर, दिलीपराव देशमुख, गणेश हाके, दिलीपराव देशमुख, गणेश हाके, बब्रुवान खंदारे, सुधाकर भालेराव, गोविंद केंद्रे आचार्य गुरुराज स्वामी महाराज, राहुल केंद्रे आदी उपस्थित होते.