पुणे : साखर कारखाने इथेनॉल उत्पादनाच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपल्याकडील यंत्रसामग्रीचा योग्य वापर करून आणि धान्य आधारित तंत्रज्ञान स्वीकारून वर्षभर सुरू राहू शकतात,असे प्रतिपादन माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. प्राज इंडस्ट्रीजच्या वतीने आयोजित तांत्रिक कार्यशाळेत टोपे बोलत होते. यातून साखर कारखान्यांचा महसूल प्रतिटन गाळप ३०० ते ४०० रुपये वाढू शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यशाळेत इथेनॉल प्रकल्पांमध्ये धान्य-आधारित अॅड-ऑन मॉड्यूल्सद्वारे इथेनॉल उत्पादन विस्तारासोबतच देशातील इथेनॉल मिश्रणाच्या वाढत्या संधींवर, जैवइंधन क्षेत्रातील नवकल्पनांवर चर्चा करण्यात आली. प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी, बायोएनर्जी विभागाचे अध्यक्ष अतुल मुळे आणि इथेनॉल उद्योगाशी संबंधित तज्ज्ञ उपस्थित होते.
माजी मंत्री टोपे म्हणाले की, केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रण कार्यक्रमांतर्गत इथेनॉल उत्पादन वाढवण्यासाठी अनेक धोरणात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. उसाच्या हंगामी उपलब्धतेमुळे निर्माण होणाऱ्या मर्यादा लक्षात घेऊन, सरकारने सहकारी साखर कारखान्यांना इथेनॉल प्रकल्पांचे बहुपर्यायी प्रकल्पांमध्ये रूपांतर करण्यासाठी वित्तीय साहाय्य जाहीर केले आहे. दरम्यान, प्राज इंडस्ट्रिजचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांनी सांगितले की, ग्लोबल बायोफ्युएल अलायन्समुळे नव्या संधी उपलब्ध होत असून, भारतीय इथेनॉल उत्पादन प्रकल्प या जागतिक जैवइंधन व्यापारातील प्रमुख भागीदार बनू शकतात. प्राजमध्ये आम्ही शाश्वत उपाय शोधण्यात आणि भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेला बळकट करण्यासाठी काम करीत आहोत.